निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खबरदारी

बाद नोटा बदलण्यासाठी तसेच जिल्ह्य़ात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीतील मतदाना दरम्यानचा ‘बोटाला शाई’ लावण्याताली गोंधळ टाळण्यासाठी, नोटा बदलणाऱ्या व्यक्तीच्या उजव्याच हाताच्या तर्जनीला शाई लावावी, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्य़ातील सर्व राष्ट्रीयकृत बँका व टपाल कार्यालयांना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस यांनी तसे पत्रच आज, शुक्रवारी संबंधितांना दिले आहे. या सूचनेमुळे बोटाला शाई लावण्यातील गोंधळ कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्य़ात सध्या संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी व पाथर्डी नगरालिकेची निवडणुक प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी दि. २७ डिसेंबरला मतदान होत आहे. या मतदानासाठी आठवडय़ाचा कालावधी बाकी आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदानासाठी मतदारांच्या डाव्या बोटाला शाई लावली जाणार आहे.

सध्या बाद नोटांनी देशभर गहजब निर्माण केलेला आहे. पाचशे व एक हजार  मूल्यांच्या नोटा बदलण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका व टपाल कार्यालयात गर्दी होत आहे. नोटा बदलण्यातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी, केंद्रीय वित्त विभागाने बँका व टपाल कार्यालयांना संबंधितांच्या बोटांना शाई लावण्याची सूचना केली आहे. ग्राहकाच्या कोणत्या बोटांना शाई लावावी, याबद्दल मात्र सूचना नाहीत. त्यामुळे नोटा बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या, विशेषत: डाव्याच बोटांना शाई लावण्याचे प्रकार बँक व टपाल कर्मचाऱ्यांकडून होत आहेत. नोटा बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या बोटावरील डाग किमान आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने बँका व टपाल कार्यालयांना नोटा बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या उजव्या बोटांवर शाई लावावी, अशी सूचना पत्र पाठवून केली आहे. गेली दोन दिवस बँका व टपाल कार्यालयांना शाई उपलब्ध झालेली नव्हती. मात्र शुक्रवारी काही बँका व टपाल कार्यालयातून ही शाई उपलब्ध झाल्याने ग्राहकांच्या बोटाला शाई लावली जात आहे.