माढा लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेले राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी बंड करून स्वत:ची अपक्ष उमेदवारी दाखल केली. आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट करताना शरद पवार व अजित पवार यांनी मोहिते-पाटील घराण्यामध्ये भांडण लावल्याचा आरोप प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला. तर दुसरीकडे महायुतीतही राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांनीही बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे महायुतीतही गोंधळाची स्थिती दिसून येते.
अकलूज, पंढरपूर, माढा, करमाळा आदी भागातून शेकडो चार चाकी वाहनांमधून हजारो कार्यकर्ते प्रतापसिंहांच्या समर्थनासाठी आले होते. यात त्यांचे शक्तिप्रदर्शन झाले. परंतु उमेदवारीअर्ज दाखल करण्याची वेळ संपत आल्यामुळे प्रत्यक्षात शक्तिप्रदर्शनासाठी मिरवणुकीचे नियोजन करता आले नाही. उमेदवारी दाखल करताना प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या सोबत त्यांचे पुत्र धवलसिंह मोहिते-पाटील, पत्नी पद्मजादेवी मोहिते-पाटील व भगिनी जयश्री चव्हाण (कोल्हापूर) आदींची उपस्थिती होती.
उमेदवारी दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. पवार काका-पुतण्यांनीच मोहिते-पाटील घराण्यात फूट पाडून भांडणे लावली, असा आरोप त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीसाठी आपण सर्वप्रथम स्वत:ची उमेदवारी जाहीर केली असता शरद पवार यांनी केवळ आमच्या घराण्यात भांडण लागावे म्हणून आपले ज्येष्ठ बंधू विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाणीवपूर्वक दिली. पवार काका-पुतण्यांना माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी मते मागायचा नैतिक अधिकार उरला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत अस्वस्थता पसरली असताना दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांनीही महायुतीच्या विरोधात बंडखोरीचे निशाण फडकावत स्वतंत्रपणे उमेदवारीअर्ज दाखल केला आहे. त्यामुळे माढय़ात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाशिव खोत यांची अडचण झाली आहे. स्वरूप जानकर यांनी आपल्या अपक्ष उमेदवारीमागची भूमिका स्पष्ट करताना धनगर समाजाचे प्रतिनिधित्व राखण्यासाठी व महायुतीला धडा शिकविण्यासाठी आपण निवडणूक रणांगणात उतरल्याचे सांगितले. महादेव जानकर यांना माढय़ातून उमेदवारी देण्याचे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आश्वासन दिले होते. परंतु नंतर त्यांनी आपला शब्द न पाळता महादेव जानकर यांना माढय़ातून बारामतीत पाठविले. यात आपली व संपूर्ण धनगर समाजाची फसवणूक असल्याचा आरोप स्वरूप जानकर यांनी केला.

challenge to Sharad Pawar to remove Santosh Chaudharys displeasure in Raver
रावेरमध्ये संतोष चौधरी यांची नाराजी दूर करण्याचे शरद पवार यांच्यासमोर आव्हान
Amol Kolhe, Dilip Mohite, Shirur,
शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी
Ajit Pawar, Shrirang Barne,
खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला अजित पवार आले, पार्थ पवार येणार?
Heena Gavit nandurbar
नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी