मागील लोकसभा निवडणुकीत २३ अपक्ष उमेदवारांना सव्वालाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. परिणामी शिवसेनेच्या पदरी पराभव पडला. कारण मतदान कमी होते. यावेळीदेखील अपक्षांची भलीमोठी मांदियाळी निवडणुकीत उभी करूनदेखील सेनेचा विजय रोखता आला नाही.  या लोकसभा निवडणुकीत २५ अपक्षांनी १ लाख ३७ हजार ७८ मते मिळवली.
२००९च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचा उमेदवार  वगळता अन्य उमेदवारांना मते मिळतील, असा विश्वास नव्हता. मतमोजणीनंतर प्रत्यक्षात समोर आलेली आकडेवारी अचंबित करणारी होती. २८ हजार मतांचा आकडा बसपाने गाठला. तर बसपासह उर्वरित २२ जणांच्या मतांची गोळाबेरीज १ लाख १२ हजाराच्या घरात गेली. अपक्षांमुळे झालेली मताची विभागणी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली आणि केवळ ६ हजार ७८७ मतांनी शिवसेनेचा पराभव झाला.
यंदाच्या निवडणुकीतही जवळपास तशीच रणनीती आखण्यात आली होती. मागील उमेदवारांच्या संख्येचा विक्रम मोडीत काढत २७ जणांनी उमेदवारी दाखल केली. त्यात भारतीय जनता पार्टीचे निलंबित प्रदेश उपाध्यक्ष सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी उडी घेतल्यामुळे अधिकच रंगत वाढली.  देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करण्यासाठी उमेदवारी दाखल केली असल्याची मोठी चर्चा झाली. सुरुवातीच्या काळात त्यांना आपला राष्ट्रवादीशी काही संबंध नाही, हे सांगण्यातच ऊर्जा खर्च करावी लागली.  मागील निवडणुकीप्रमाणे बसपाने पुन्हा उमेदवारी दाखल केल्यामुळे आपसूकच निवडणुकीला चौरंगी रूप आले. देशमुख मतांची किती आघाडी घेतात, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असल्याचे भाकित करण्यासाठी सामान्य मतदारांना भविष्यवेत्त्याची गरज लागली नाही. म्हणूनच प्रचाराची राळ उडवूनदेखील रोहन देशमुख यांना केवळ २६ हजार ८६८ मत मिळाली. बसपाला मागील निवडणुकीतील मतांची आकडेवारी वाढविण्यासाठी यंदा संधी होती. मात्र केवळ ३२२ मतांची बेरीज त्यांच्या मागील आकडय़ात जमा झाली. उर्वरित २३ उमेदवारांपकी परंडा येथील तुकाराम गंगावणे यांच्या पारडय़ात पडलेली १० हजार २१० मते वगळता आम आदमी पार्टीच्या विक्रम सावळेंसकट इतरांना पाच आकडी संख्या गाठता आली नाही. रोहन देशमुख यांना लाखाच्या पुढे मतदार पसंती देतील,  उर्वरित अपक्ष उमेदवार पुन्हा लाखमोलाचा घोळ घालतील. मुस्लिम आणि दलित मते राष्ट्रवादीच्या पारडय़ात पडतील, असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अंदाज होता. तो फोल ठरला. बसपाचे ढाले, अपक्ष रोहन देशमुख यांच्यासह २५ अपक्षांनी मिळून १ लाख ३७ हजार ७८ मतांचा घोळ घालूनदेखील २ लाख ३४ हजार ३२५ एवढय़ा प्रचंड बहुमताने शिवसेनेचे प्रा. गायकवाड दिल्लीला रवाना झाले. सेनेच्या बाजूने मतदारसंघातून मिळालेला हा प्रचंड जनाधार आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धोक्याची घंटाच आहे.