भाजपात नेतृत्व बदलाची चर्चा सुरु असतानाच अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री बदलले तर सरकारचा पाठिंबा काढू, असा इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरु असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला होता. भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री बदलण्याची आवश्यकता नसून फडणवीस हे सक्षम नेते आहेत, असे सांगत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री बदलल्यास आम्ही सरकारसोबत राहणार नाही, असा इशाराच दिला आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी आहोत. ते मराठा समाजाला आरक्षण देण्यास सक्षम आहेत, असे रवी राणा यांनी सांगितले.

फडणवीस यांच्यासोबत काम करताना आम्हाला चांगला अनुभव आल्याचा त्यांनी नमूद केले. फडणवीस यांनी जनतेची काम केली असून यापुढेही ते चांगलंच काम करतील. फडणवीस यांच्यामुळे शिवसेना सत्तेत असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेलाही चिमटा काढला. राज्याच्या विधानसभेत एकूण सात अपक्ष आमदार असून यातील सहा आमदारांचा भाजपाला पाठिंबा आहे. या गटाचे नेतृत्व आमदार रवी राणा करतात.