पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याची घोषणा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केली. जिल्ह्य़ाच्या पर्यटनाचा अद्ययावत आराखडा तयार करण्यात येत असून, जिल्ह्य़ातील जास्तीतजास्त तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळांना मोठा निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
तालुक्यातील विविध विकासकामांचे उदघाटन मंगळवारी शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे प्रमुख पाहुणे म्हणcन उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आमदार विजय औटी होते. शिंदे व शिवतारे यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल या वेळी औटी यांच्या हस्ते त्यांचा तालुक्याच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बेपर्वाई कारभारामुळे शहर व ग्रामीण भागात मोठी दरी निर्माण झाली, अशी टeका शिंदे यांनी केली. ते म्हणाले, भाजप-शिवसेना युतीचे राज्य सरकार विकासाच्या माध्यमातून ही दरी दूर करण्याचा प्रयत्न करील. जिल्ह्य़ातील दुष्काळ निवारणासाठी आपण ठोस पावले उचलणार आहोत. विकासाचा अनुषेश भरून काढण्यासाठी जल व कृषी प्रश्नांना प्राधान्याने न्याय देण्याचे काम केले जाईल. आपल्याकडे गृह खात्याबरोबरच पर्यटन विभागाचाही कारभार असल्याने त्या खात्याचा जास्तीतजास्त निधी जिल्ह्य़ात आणण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.  
शिवतारे यांनी या वेळी औटी यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, विरोधी पक्षात असूनही गेल्या दहा वर्षांत औटी यांनी मोठी कामे उभी केली. आता सत्ता आपलीच आहे, मंत्री या नात्याने आमची जबाबदारी वाढली असून येत्या पाच वर्षांत तालुक्यात जलसंधारणाच्या माध्यमातून हरितक्रांती होईल अशा पद्घतीने निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पुढील दोन वर्षांत पारनेर-नगर मतदारसंघातील जलसंधारणाच्या कामांसाठी शिवतारे यांनी आठ कोटींचा निधी देण्याची मागणी औटी यांनी या वेळी केली. मागील सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या बंधाऱ्यांचे कार्यारंभ आदेश अद्यापही प्रलंबित आहेत. ते नव्या सरकारने थांबविले असले तरी या कामांमुळे जलसंधारण होणार असल्याने या कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची मागणी औटी यांनी केली.