सिन्नर येथील इंडिया बुल्स कंपनीच्या कोळसा वाहतुकीस कोपरगावकरांनी विरोध केल्यानंतर ही नियोजित वाहतूक इतर मार्गाने करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आमदार अशोक काळे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी ही माहिती दिली.
इंडिया बुल्सच्या सिन्नर येथील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी दररोज ४ हजार टन कोळसा लागतो. तो कोपरगाव येथील रेल्वेस्थानकावर उतरवण्यात येणार होता, येथून तो मालमोटारींद्वारे सिन्नरला पाठवण्यात येणार होता. या वाहतुकीला कोपरगावकरांनी विरोध केला. याबाबत रेल्वे प्रशासनाला तसे  कळवण्यात आले होते. हा निर्णय रद्द करण्यातच आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. तसे लेखी पत्र त्यांनी दिले आहे.
कोपरगाव तालुक्यातील रस्ते अगोदरच खराब झालेले आहेत. या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था अधिक दयनीय झाली असती. सिन्नर येथून नाशिकरोड, देवळाली कॅम्प, ऊगांव आदी रेल्वेस्थानके जवळ असताना हा कोळसा कोपरगाव स्थानकावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यालाच कोपरगावकरांनी आक्षेप घेतला होता. केवळ रस्तेच नव्हे, तर या मोठय़ा व अवजड वाहतुकीमुळे रहदारीचाही प्रश्न निर्माण झाला होता.
संभाव्य अपघातांमुळे स्थानिक लोकांचा जीव त्यात धोक्यात आला असता, कोळशाच्या धुळीकणांमुळे परिसराचे आरोग्यही धोक्यात आले असते. या सर्व गोष्टी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यात फेरबदल करण्यात आला आहे. याबाबत शिंगणापूर ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव करून या वाहतुकीला विरोध दर्शवला होता.
इंडिया बुल्स या कंपनीने अगोदरच आमच्या शेतीचे हक्काचे साडेतीन टीएमसी पाणी पळवून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आता कोळशाची वाहतूकही आमच्याच माथी मारून खराब रस्ते आणखी खराब करून या भागातील जनतेवर अन्याय होणार होता. तो आता टळला आह,े असे कोल्हे यांनी सांगितले.