देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. करोनाला हरवण्यासाठी हा लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अशात सगळे कारखाने, गोडाऊन आणि रोजगार बंद झाले आहेत. अनेक लोकांचं हातावर पोट होतं. मात्र या सगळ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. भिवंडीतील भिनार येथील आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या एका कुटुंबाने रोजगार नसल्याने पाच दिवस फक्त पाणी पिऊन आणि कंदमुळं खाऊन दिवस काढले आणि करोनाला हरवण्याचा निर्धार केला.

१४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही घोषणा केली आहे त्याआधी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्या आली. भिनार येथील गरीब कुटुंब मागील पाच दिवसांपासून घरातच आहे. काहीही झालं तरीही चालेल पण करोनाला हरवणार हा निर्धार या कुटुंबाने केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना या कुटुंबाने सांगितलं, “आम्हाला रोज काम करुन १०० ते २०० रुपये मिळत. त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र करोनामुळे सगळं बंद झालं आहे. जेवणाचे हाल होत आहेत. मुलं जेवणात भात किंवा पोळी मागतात. मात्र पैसे नसल्याने त्यांना जेवण देणं शक्य नाही. पाणी पिऊन उपाशीच झोपावं लागतं आहे. मात्र आम्हाला आमची पर्वा नाही. करोनाला हरवायचं आहे.” असा निर्धार या कुटुंबीयांनी बोलून दाखवला. आता हे कुटुंब जर घरात राहू शकतं तर कारण नसताना मोकाट फिराणारे लोक यांचा आदर्श घेऊ शकत नाहीत का? हा खरा प्रश्न आहे. घराबाहेर न पडणाऱ्या हेंगाडे कुटुंबाने एक चांगला आदर्श या निमित्ताने घालून दिला आहे.

आणखी वाचा- “आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली मायेची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतली माघारी

दरम्यान या कुटुंबाची परिस्थिती जेव्हा समजली तेव्हा त्यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून भिवंडतील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. भिवंडी जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेने या कुटुंबाला मदत केीली आहे. एवढंच नाही तर काम नसल्याने ज्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्या सगळ्या गरीब कुटुंबांना या संस्थेने तांदूळ, तेल, साखर, मसाला, तेल, पीठ, डाळ, विविध कडधान्य असं एक महिना पुरेल इतकं वाण सामान दिलं आहे.