महाराष्ट्रात पुन्हा एकदा देंवेद्र सरकार येणार असल्याचा अंदाज इंडिया टुडेच्या एक्झिट पोलकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं असून ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झालं आहे. २४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल समोर येणार असून त्याआधी एक्झिट पोल समोर आले असून पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आलं आहे.

इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला १०९ ते १२४ तर शिवसेनेला ५७ ते ७० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसंच काँग्रेसला ३२ ते ४० जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसला ४० ते ५० ते जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महायुतीचं एकत्रित बोलायचं गेल्यास भाजपा आणि शिवसेनेला मिळून १६६ ते १९४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ७२ ते ९० जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना २२ ते ३४ जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

महायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज
महायुतीला १९२ ते २१६ जागा मिळतील असा अंदाज एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. आघाडीला ५५ ते ८१ जागा मिळतील इतर पक्षांना ४ ते २१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL
न्यूज १८ एक्झिट पोलचा निष्कर्ष मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसाठी धक्कादायक आहे. न्यूज १८ च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना महायुतीला दणदणीत यश मिळणार आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल.

एक्झिट पोलच्या आकडयानुसार काँग्रेसला १७ तर राष्ट्रवादीला अवघ्या २२ जागांवर समाधान मानावे लागेल. आघाडीच्या मिळून ४१ जागा निवडून येतील. त्याचवेळी सत्ताधारी भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपाला सर्वाधिक १४४ आणि शिवसेना ९९ जागा मिळतील असा अंदाज आहे. महायुतीला मिळून २४३ जागा मिळण्याचा अंदाज आहे.