प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आणि अनेक खेळाडूंना दुखापतीनं ग्रासलेलं असताना भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात शानदार कामगिरी केली. महत्त्वाचं म्हणजे ‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाची विजयाची परंपरा भारतानं गुंडाळत २-१ मालिका जिंकली. विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अभिमान व्यक्त केला आहे.

भारताने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या जोरदार विजयासह मालिका जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे. “गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील,” असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा- IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या ३२ वर्ष अबाधित राहिलेल्या विक्रमाला ‘टीम इंडिया’चा धक्का

“पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील भारतीय संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्द यांच्या जोरावर संपूर्ण कसोटी मालिका जिंकली. धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय संघानं या मालिकेत नवीन विक्रम प्रस्थापित केला ही देशातील सर्व क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा- ‘गाबा’चं घर खाली! कांगारुंवर ७० वर्षांनी नामुष्की, टीम इंडियाने रचला इतिहास

‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी विजय मिळवला आहे. या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघानं फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत कसोटी मालिकेवर नाव कोरलं.

आणखी वाचा- शरद पवारांचे ‘टीम इंडिया’च्या विजयावर ट्विट, म्हणाले…

तेव्हाच ठरवलं… जिंकण्यासाठी खेळायचं- अजिंक्य रहाणे

“आजचा हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा विजय शब्दात कसा वर्णन करावा हे मला माहिती नाही. आमच्या संघातील साऱ्या खेळाडूंचा मला अभिमान आहे. आम्हाला आमच्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायची होती. मी जेव्हा फलंदाजीसाठी उतरलो तेव्हाच आम्हीच ठरवलं की जिंकण्यासाठी खेळायचं. मग मी माझ्या पद्धतीने खेळलो, कारण आमच्याकडे ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल हे दोघे शिल्लक होते. पुजाराला तर या विजयाचे श्रेय दिलेच पाहिजे. त्याने दडपणाचा चांगला सामना केला आणि त्यानंतर पंतने तर सामन्याचा शेवट अगदी उत्तम केला”, असं अजिंक्य रहाणे मालिका विजयानंतर म्हणाला.