X

इंडिया बुल्स एकलहरे वीज केंद्राच्या मुळावर?

सिन्नर येथील इंडिया बुल्स या खासगी वीजनिर्मिती प्रकल्पाला नगर व नाशिक जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला असतानाच आता ही कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील नाशिक औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्याही (एकलहरे) मुळावर उठल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

सिन्नर येथील इंडिया बुल्स या खासगी वीजनिर्मिती प्रकल्पाला नगर व नाशिक जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला असतानाच आता ही कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील नाशिक औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्याही (एकलहरे) मुळावर उठल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. शेतीचे पाणी तोडून या कंपनीला पाणी देण्याचा घाट घालण्यात आला, आता या कंपनीमुळे एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रही अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नाशिक शहराच्या सांडपाण्यावर इंडिया बुल्स प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यालाच नगर व नाशिक जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. प्रक्रिया केलेले हे सांडपाणी इतके दिवस शेतीला दिले जात होते. ते तोडून आता इंडिया बुल्स पोसण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सिन्नर, येवला, कोपरगाव, राहाता या भागांतील शेती उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होते. मात्र शेतकऱ्यांचा विरोध डावलून इंडिया बुल्सच्या वीजनिर्मिती केंद्राला सर्वतोपरी संरक्षण देण्यात आले. आता त्याचा परिणाम एकलहरे येथील सरकारी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रावरही होणार असल्याची बाब पुढे आली आहे. शेतीचे पाणी तोडून इंडिया बुल्सला रेडकार्पेट अंथरल्यानंतर आता एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचाही बळी देण्याचा डाव असावा, अशी शंका घेण्याइतपत बाबी पुढे येऊ लागल्या आहेत. कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीने ही बाब पुढे आली.

एकलहरे येथील सार्वजनिक क्षेत्रातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र ४० वर्षांपूर्वी म्हणजे सन ७०-७१ मध्ये सुरू झाले. नाशिक शहराच्याच सांडपाण्यावर कार्यरत असलेल्या या प्रकल्पातून सध्या ९१० मेगाव्ॉट वीजनिर्मिती होते. त्याच्या विस्ताराचा प्रकल्प आता हाती घेण्यात आला असून अणखी ६६० मेगाव्ॉट वीजनिर्मिती त्याद्वारे होईल. त्याची निविदाही जानेवारीमध्येच काढण्यात आली. या विस्तार प्रकल्पासाठी नाशिक महानगरपालिकेकडून पुनर्वापराचे ७.८० दशलक्ष घनमीटर पाणीही मंजूर करून घेण्यात आले आहे.

आता याच पाण्यावर सिन्नरस्थित इंडिया बुल्सच्या प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली आहे. या कंपनीशी प्रतिदिन १९० दशलक्ष लिटर पाणी देण्याचा करारही पाटबंधारे विभागाने केला आहे. नाशिकच्या सांडपाण्यातूनच हे पाणी देण्यात आले आहे. यातील मेख अशी आहे की, नाशिक महानगरपालिकेला दररोज १२० दशलक्ष लिटर सांडपाणी उपलब्ध होते. मग या कंपनीला करारानुसार १९० दशलक्ष लिटर पाणी कसे आणि कुठून देणार? ते दिले तर, एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राची गरज कशी भागवणार? त्यातही गंमत अशी की, सार्वजनिक क्षेत्रातील एकलहरे येथील केंद्रातून ६० दशलक्ष लिटर पाण्याद्वारे ९१० मेगाव्ॉट वीजनिर्मिती होते. इंडिया बुल्सला मात्र १ हजार २०० मेगाव्ॉट वीज र्निर्मितीसाठी तिप्पट म्हणजे तब्बल १९० दशलक्ष लिटर पाणी देण्यात येणार आहे. या कंपनीलाच एवढे पाणी दिले तर एकलहरे केंद्राला कुठून पाणी उपलब्ध होणार, हा प्रश्नच आहे.

एकलहरे केंद्राने मागचे वर्षभर प्रतिदिन सरासरी ७० हजार २३० दशलक्ष घनमीटर पाणी गोदावरी नदीतून उचलले. त्यापोटी २५ कोटी रुपयांची पाणीपट्टी भरली आहे. यातील ७० ते ८० टक्केहे नाशिक महापालिकेचे सांडपाणी आहे. नाशिक पाटबंधारे विभागाने नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीसाठी प्रति दहा हजार लिटरला ६४ रुपये, मार्च ते जुलै या कालावधीसाठी ९६ रुपये आणि जुलै ते ऑक्टोबर या कालावधीसाठी ३२ रुपये याप्रमाणे दर आकारला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या प्रकल्पाला ३२ ते ९६ रुपयांप्रमाणे दर आकारताना इंडिया बुल्सला मात्र १० रुपये ७० पैसे दराने पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इंडिया बुल्सला असलेला काँग्रेसचा राष्ट्रीय वरदहस्त हा नगर व नाशिक जिल्ह्य़ात चर्चेचा विषय बनला आहे. केंद्र सरकारच्या ‘जावया’सारखा थाट असलेल्या या कंपनीच्या गरजेनुसार नियम वाकवण्याचा उद्योग संबंधित सर्वच खात्यांकडून सुरू आहे. या कंपनीसाठी सुरुवातीला शेतीचे पाणी तोडण्यात आले. नगर व नाशिक जिल्ह्य़ातील सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्राला त्याचा फटका बसेल.

 आता एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रासमोरही अडचणी उभ्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काळे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे तक्रार दाखल केली असून, इंडिया बुल्सशी झालेला करार त्वरित रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.     

माहिती अधिकारातून मिळालेली माहिती

* एकलहरेच्या तुलनेत इंडिया बुल्सला तिप्पट पाणी देणार

* एकलहरेच्या तुलनेत इंडिया बुल्सला कमी दराने पाणी पुरवठा

* इंडिया बुल्सला पाणी पुरविण्यासाठी शेतीचे पाणी तोडले

* इंडिया बुल्सला नगर व नाशिक जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांचा आक्षेप

  • Tags: eklahare, farmer, indiabulls, politics,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain