देशातील काही राज्यात नोटांच्या अभूतपूर्व तूटवडय़ामुळे नोटा बंदीच्या दिवसांचे स्मरण होत असताना दुसरीकडे  नाशिकच्या ज्या चलार्थ पत्र मुद्रणालयात नोटांची छपाई केली जाते, तिथे कागद किंवा शाईची कोणतीही टंचाई नसल्याचे मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत नाशिकरोडच्या मुद्रणालयात १०, ५०, ५०० रुपयांच्या नोटांची छपाई सुरू आहे. तसेच २० आणि १०० रुपयांच्या नोटांच्या नवीन सुरक्षा रचनेला अर्थ मंत्रालय, रिझव्‍‌र्ह बँकेकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. यामुळे त्या नोटांची छपाई तूर्तास होत नसल्याचे सांगण्यात आले.

अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील नाशिकरोड येथील चलार्थ मुद्रणालयासह (सीएनपी) देशातील चार मुद्रणालयात १०, २०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांची छपाई केली जाते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या म्हैसूर आणि सालबोनी मुद्रणालयात दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई केली जाते. नाशिकरोडच्या सीएनपीमध्ये मागील वर्षांत नोटाबंदीनंतरच्या वर्षांत नोटा छपाईचे दिलेले ५७०० मिलियन इंडेन (लक्ष्य) पूर्ण करण्यात आल्याची माहिती मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली. त्यांच्या म्हणण्यानुसार मुद्रणालयात नोटा छपाईसाठी लागणारा कागद, शाईचा कोणताही तूटवडा नाही. पुढील सहा महिने पुरेल इतकी सामग्री मुद्रणालयात उपलब्ध आहे. २० आणि १०० रुपयांच्या नोटांच्या नवीन सुरक्षा रचनेला मान्यता मिळाल्यानंतर अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार त्यांच्या छपाईचे कामही केले जाणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

मुळात, नोटा छपाईचा आणि देशातील चलन तुटवडा यांचा संबंध नाही. छपाईचे काम मुद्रणालयात होत असले तरी त्याची वितरण व्यवस्था रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया सांभाळते. कोणत्या राज्यात किती, कोणत्या नोटा पाठवायच्या याचा निर्णय आरबीआयकडून घेतले जातात. यामुळे देशांतर्गत चलन तूटवडय़ाशी छपाईचा संबंध नसल्याचे मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. या घडामोडीत मुद्रणालय व्यवस्थापनाने कानावर हात ठेवले आहे.