News Flash

अमेरिकेत भारताचा आंबा निर्यातीत नवीन विक्रम

कोकणचा हापूस, गुजरातमधील केसर आणि कर्नाटकातील बेंगनपल्ली या प्रमुख तीन भारतीय आंब्यांनी अमेरिकावासीयांवर चांगलीच भुरळ पाडली असून यंदाच्या हंगामात निर्यातीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत

| July 2, 2013 02:27 am

कोकणचा हापूस, गुजरातमधील केसर आणि कर्नाटकातील बेंगनपल्ली या प्रमुख तीन भारतीय आंब्यांनी अमेरिकावासीयांवर चांगलीच भुरळ पाडली असून यंदाच्या हंगामात निर्यातीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत तब्बल २९६ टन भारतीय आंबा एकटय़ा अमेरिकेत निर्यात झाला आहे. भाभा अणू संशोधन केंद्राच्या नाशिक येथील केंद्रात निर्यातीआधी या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली.
आपल्या वैशिष्टय़पूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या हापूस आंब्यासोबत इतर भारतीय आंब्यांनी यंदा अमेरिकेतील खवय्यांच्या जिभेचे पुरेपूर चोचले पुरविले. गत सहा वर्षांपासून अमेरिकेला आंबे पाठविले जात असून यंदाच्या सातव्या वर्षांत निर्यातीने उच्चांक गाठल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेला निर्यात झालेल्या भारतीय आंब्याचा आढावा घेतल्यास आतापर्यंत अधिकतम २६० टनची निर्यात झाली आहे. यंदा हे प्रमाण नेहमीच्या निर्यातीपेक्षा ३६ टनने वाढले. अमेरिकेत हापूससह इतर काही निवडक भारतीय आंब्यांची निर्यात २००७ पासून सुरू झाली. पहिल्या वर्षी २००७मध्ये १५७ टन, २००८- २६०, २००९- १२१, २०१०- ९५, २०११- ८४, २०१२- २१० टन आंबा एकटय़ा अमेरिकेत निर्यात झाला. यंदाच्या हंगामात सर्वाधिक म्हणजे २९६ टन आंबा निर्यात करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे उपसरव्यवस्थापक प्रकाश अष्टेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. म्हणजे मागील सात वर्षांत एकूण १३७५ टन आंबा निर्यात करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या बाजारात कृषी मालास प्रवेश करावयाचा झाल्यास त्यास प्रथम २१ विविध निकषांचे अडथळे पार करावे लागतात. त्यात तो माल किटाणूविरहित असणे आवश्यक असते. याकरिता आंब्यावर विकिरण प्रक्रिया केली जाते. त्यासाठी भाभा अणू संशोधन केंद्राने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे खास केंद्राची उभारणी केली आहे. त्याची धुरा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे आहे. अमेरिकेत निर्यात करावयाच्या आंब्यावर ही प्रक्रिया करावी लागत असल्याने भारतीय आंब्यांचा अमेरिका प्रवास नाशिकमार्गे होतो. यंदा २२ एप्रिलपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेचा दोन जुलै २०१३ हा हंगामातील अखेरचा दिवस असल्याचे अष्टेकर व महामंडळाचे मिलिंद जोशी यांनी सांगितले. भारतीय आंब्यास अमेरिकेतील न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, सॅन-फ्रान्सिस्को, लॉस एन्जेलिस, शिकागो, मियामी, नेवार्ड, दलास आदी शहरांतून मागणी होती. निर्यातीचा हा आकडा मुबलक उत्पादनामुळे यंदा आणखी वाढला असता. परंतु, विकिरण प्रक्रिया अमेरिकेच्या कृषी विभागातील निरीक्षकाच्या उपस्थितीत पार पडते. या कामासाठी संबंधितांकडून कमी कालावधी मिळाल्याने हा आकडा मर्यादित राहिल्याचे सांगण्यात आले.

काय आहे विकिरण प्रक्रिया?
गॅमा किरणांचा मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील किडही नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रियाही थांबते. किड रोखण्यास हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते. ही प्रक्रिया करणारे देशात नाशिकमध्ये एकमेव केंद्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 2:27 am

Web Title: indian mango exports to us set to reach record high
टॅग : Exports,Mango
Next Stories
1 केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे पोलीस दलात प्रचंड अस्वस्थता
2 प्रगत महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीची फरफट
3 महागाईच्या दुष्टचक्रात एचआयव्ही बाधित मुलांची परवड!
Just Now!
X