22 September 2020

News Flash

शिवरायांच्या पोवाड्याला पाकिस्तानी विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद

पुणे जिल्ह्यातील जांभूळदरा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विडिओ कॉलद्वारे हा संवाद घडवून आणला.

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे पाकिस्तानी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांशी डिजिटल संवाद साधला आहे. यावेळी दोन्ही देशातील विद्यार्थानी मनसोक्त गप्पा मारल्या. ज्ञानाचे आदान-प्रदान करण्यात आले. यावेळी पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी भारताचे राष्ट्रगीत सुरु होताच उभे राहून त्याचा सन्मान राखला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यावर टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

पुणे जिल्ह्यातील जांभूळदरा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विडिओ कॉलद्वारे हा संवाद घडवून आणला. दरम्यान, इस्लामाबाद येथील रूट इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मनं भारतीय विद्यार्थानी जिंकली. एकीकडे भारत आणि पाकिस्तान हे जगाच्या पाठीवर एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जातात. मात्र, या विद्यार्थ्यांच्या संवादातून ते एकदाही जाणवलं नाही, हे या संवादाच वैशिष्ट्य ठरले.

पुणे जिल्ह्यातील जांभूळदरा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवीपर्यंत वर्ग खोल्या आहेत. मात्र, येथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शैक्षणिक पात्रता भल्या-भल्यांना लाजवेल अशी आहे. शिक्षक नागनाथ विभूते यांनी पाकिस्तानच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ संवाद साधण्यासाठी कष्ट घेतले. यासाठी त्यांनी एज्युकेशन मायक्रोसॉफ्ट या वेबसाईटचा उपयोग केला. या वेबसाईटवर जगभरातील शिक्षक आणि शाळा रजिस्टर आहेत. व्हिडिओ संवाद साधण्यासाठी केवळ आपल्याला ऑनलाइन अपॉईंमेंट घ्यावी लागते. त्यानंतर असा व्हिडिओ संवाद साधता येतो. हाच प्रयोग त्यांनी केला आणि पाकिस्तानमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी चर्चा घडवली. जिल्हा परिषद शाळेतील हा चौथा परदेशातील व्हिडिओ संवाद होता. या अगोदर अमेरिकेतील म्युझिअमशी विद्यार्थांनी अशा संवाद साधला होता.

व्हिडिओ संवाद सुरू होताच भारत आणि पाकिस्तान देशातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण होते. भारतीय विद्यार्थांनी पाकिस्तानमधील विद्यार्थांना आपल्या राष्ट्रध्वजाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर इस्लामाबाद येथील रूट इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थानी त्यांचे राष्ट्रगीत म्हणून दाखवले. तर सिंधू नदी बद्दल भारतीय विद्यार्थांनी माहिती दिली. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थांने चक्क पाकिस्तानच्या ध्वजाचे त्यांच्याच विद्यार्थांना महत्व पटवून दिले. यावेळी पाकिस्तानी शिक्षिकेने त्याचे कौतूक केले. दरम्यान, शिवरायांचा एक पोवाडाही एका भारतीय विद्यार्थाने सादर केला. त्यावेळी पाकिस्तानी विद्यार्थांनी टाळ्यांनी दाद दिली. अशाच प्रकारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरील कविता, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची माहिती देण्यात आली.

पाकिस्तानच्या विद्यार्थांनी त्यांचा इतिहास सांगत भारतातील पर्यटनस्थळे आणि शहरे सांगितली. भारतीय संस्कृतीच त्यांनी कौतुकही केले. दरम्यान, इस्लामाबाद येथील शिक्षका सना मुघल यांनी त्यांच्या भावना सांगितल्या. त्या म्हणाल्या, हा संवाद साधून खूप छान वाटलं. आमची संस्कृती तसेच पाकिस्तानी ध्वजाबद्दल माहिती दिली, ती खूप छान होती.

आपण पुन्हा अशी चर्चा घडवून आणू असं देखील त्या म्हणाल्या. या चर्चेची सांगता भारतीय राष्ट्रगीत गायनाने झाली. यावेळी पाकिस्तानी विद्यार्थी आणि शिक्षकांनी उभे राहून सन्मान केला. या छोट्याशा दहा ते बारा वयोगटातील विद्यार्थांनी एकमेकांशी साधलेला संवाद खरच मोठ्यांनाही प्रेरणादायी ठरू शकतो. त्यामुळे अशाच संवादाची गरज दोन्ही देशांना असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:03 pm

Web Title: indian national anthem honored by pakistani students
Next Stories
1 अतिक्रमणांमुळेच कालवा फुटला!
2 ‘सिंहगड मार्गा’ला पर्यायी रस्त्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित
3 कालवा फुटीनंतर मध्यभागासह उपनगरातही वाहतूककोंडी
Just Now!
X