भारतीय वंशाचे आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांचे आपल्या मूळ गावी मालवण तालुक्यातील वराडमध्ये आगमन झाले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. डॉ. लिओ यांच्यासोबत वडील डॉ. अशोक वराडकर, आई मेरिअम, बहीण सोफिया, सोनिया, एरीक, जॉन, त्यांची मुले उपस्थित होते. सुवासिनींनी ओवाळून व फुलांच्या पाखरणीत त्यांचे वराडमधील लोकांनी स्वागत केलं. डॉ. लिओ वराडकर येथील खास मालवाणी जेवणाचा आस्वाद घेणार आहेत.

लिओ यांचे वडील अशोक वराडकर १९६० साली भारतातून इंग्लंडला गेले. ते तिथेच स्थायिक झाले. लिओ वराडकर यांचं कुटूंब मुळचं सिंधुदूर्गमधल्या वराड गावचं आहे. लिओ वराडकर यांची २०१७ साली आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली. २०१७ साली झालेल्या आयर्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत त्यांनी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला होता. वराडकर यांना ७३ पैकी ५१ मते मिळाली.

वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात पदार्पण करणारे लिओ २७ व्या वर्षी पहिल्यांदा संसदेत निवडून गेले. त्यानंतर २०११ ते २०१३ या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवलं. २०१४ ते २०१६ या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते.