भारतीय शिक्षण व्यवस्थेतून अपेक्षित उद्देश साध्य होत नाही या पाश्र्वभूमीवर शिक्षण व्यवस्था ही युगानुकुल व भारतीय चिंतनातून विकसित होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
भारतीय शिक्षण मंडळाच्या त्रिदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोपाच्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल छिपा, महामंत्री वामनराव गोगटे उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात सध्या कार्यरत व्यवस्था कुणीही नाकारू शकत नाही, पण स्वार्थ बाजूला ठेवून नवीन व्यवस्था लागू करण्याचे सामथ्र्यही कुणी दाखवित नाही. संघटनेच्या माध्यमातून हे केले जाऊ शकते, मात्र त्यासाठी संघटन कौशल्य आणि काम करण्याची तयारी असली पाहिजे. भारतीय शिक्षण मंडळाला संघटनेच्या मदतीने हे करावे लागणार आहे. या संघटनेत आत्मानुशासन आहे. त्यामुळे संघटनेत काही मिळणार नाही, तर उलट द्यावे लागणार आहे. केवळ कायदे करून कोणतीही व्यवस्था सुधरू शकत नाही. शिक्षण क्षेत्रासंबंधी भारतात अनेक कायदे आहेत, मात्र त्या कायद्याचे समाजात पालन होत आहे का, याबाबत शंका आहे. कायदे भरपूर आहेत, पण त्यामुळे भारताला कुणीही अनुशासित देश म्हणत नाही. त्यासाठी ध्येयनिती व आत्मियता असणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या अधिष्ठानावर पक्के पाय रोवून वैचारिक चिंतनाच्या पृष्ठभूमीवर चिकटून राहणे, हे बदल येणाऱ्या काळात घडवून आणावे लागतील. पश्चिमी देश नेहमी आपलीच संस्कृती आणि विचार लादत असतात आणि त्याचा आपण स्वीकार सुद्धा करतो, मात्र ते दुसऱ्यांचा विचार अंधश्रद्धा म्हणून बाजूला ठेवतात. पश्चिमी राष्ट्राची अपयशी ठरलेली विचारधारा लादणे हाही अन्याय व अंधश्रद्धाच मानली पाहिजे.
परिवर्तन घडवून आणण्यासाठी लोकसंग्रह व लोकसंस्कार या माध्यमातून लोकांपर्यंत जावे लागे लागेल. सृजनासाठी चिंतन व परिश्रम करावे लागेल. आवडनिवड बाजूला ठेवून सात्विक कामाला स्वतला झोकून द्यावे लागेल. संघटनेत व्यक्तिगत मत मांडता येते, पण सामूहिक विचारधाराला महत्त्व दिले जाते. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश यशापयशाच्या आधारे माणसांचे मूल्यांकन होऊ शकत नाही. येत्या काळात भारतीय शिक्षण मंडळाने शिक्षणाच्या क्षेत्रातील क्रांती म्हणून समोर यावे आणि शिक्षण क्षेत्राचा विकास करावा, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.
यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अरविंद जोशी यांनी केले.