डहाणूत सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाबत हॉटेलमालकाला चौथ्यांदा नोटीस

डहाणू : डहाणू, मल्याण येथील  सर्वे नं ८/१२ या सरकारी भूखंडावर हॉटेलमालकाने अतिक्रमण केले आहे. या प्रकरणी मालकाला तीनवेळा नोटीस पाठवूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

डहाणू समुद्र किनाऱ्यालगतच्या १७ गुंठा क्षेत्रावरील सरकारी जागेव रिसॉर्ट मालकांनी अतिक्रमण केले आहे. या जागेचा पोच रस्ता आणि वाहनतळ म्हणून गैरवापर केला जात आहे.  वर्षांनुवर्षे त्याचा वापर होत आहे. याबाबत मालकांना तीनवेळा नोटीस पाठविण्यात आली. चौथ्यांदा पाठविलेल्या नोटिसीवर २४ मार्च रोजी तहसीलदारांसमोर अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, ती  पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे डहाणूतील महसूल खाते जागेवरील कारवाईबाबत अंतिम नोटीसच्या चक्रात अडकल्याचे बोलले जात आहे. डहाणू तालुक्यातील चारोटी, कासा, वरोती  येथे अनेक अतिक्रमणांना नोटीस बजावण्यात आल्यावरही त्याविरुद्ध कारवाई होत नसल्याने महसूल खात्याची भूमिका उदासीन असल्याचे दिसून येते असे म्हटले जात आहे.

डहाणू समुद्र किनाऱ्यावर राज्य मार्ग क्र. ४ लगत सर्वे. नं. ८/१२ ही जागा सरकारी  आहे. त्या जागेचा हॉटेलमालक बेकायदा वापर करत असल्याचा अहवाल मल्याण सर्कल यांनी  सादर केला आहे. या जागेवरील अतिक्रमणधारकाकडे कागदपत्र नसल्याने ते सादर करीत नाहीत. शिवाय बोमण ईराणी हे  मुळ अर्जदार  मृत असताना डहाणू नगर परिषदेने त्यांच्या नावाने परवानगी दिली आहे.  तसेच जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच बांधकाम करण्यात आले असल्याचे पुरावे महसूल विभागाकडे आहेत. तरीही जाणीवपूर्वक कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. एक महिन्यापूर्वी डहाणू तहसीलदारांनी ठेवलेल्या सुनावणीत डॉली इराणी यांनी कागदपत्र सादर करण्यासाठी मुदत मागितली होती. त्यानंतर २४ मार्च रोजी चौथ्यांदा अंतिम  सुनावणी ठेवली होती. मात्र हॉटेलमालक त्यांच्या मालकीचे कागदपत्र सादर करू शकले नाहीत.