संत वामनभाऊमहाराज स्मृतिदिनानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात लातूरचे भाजप खासदार सुनील गायकवाड यांनी हजेरी लावून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या भागाचा विकास करू, अशी मुक्ताफळे उधळताच उपस्थित लोक संतप्त झाले. या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, धार्मिक कार्यक्रमात गोंधळ नको, म्हणून गायकवाड यांना जाऊ देण्यात आले आणि संयोजक विनायक राख यांना मात्र गावकऱ्यांनी घेरून जाब विचारला. या प्रकारामुळे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधकांबाबत लोकांमध्ये असलेला संताप पुन्हा उफाळून आला.
बोरगाव चकला (तालुका शिरूर कासार) येथे संत वामनभाऊमहाराज स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या समारोपाला गावातील रहिवाशी असलेले मुंबईचे सहायक सरकारी वकील विनायक राख यांनी लातूरचे भाजप खासदार गायकवाड व बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना निमंत्रित केल्याचे जाहीर केले होते. मात्र, मुंडेंच्या बालेकिल्ल्यात गायकवाड यांना निमंत्रण कसे? अशी चर्चा सुरू झाली. या पाश्र्वभूमीवर मुंबईतील व्यावसायिक संबंधातून गायकवाड यांना निमंत्रित केल्याचे समोर आले. परिणामी भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
गायकवाड यांनी कार्यक्रमाला हजेरी लावताना केलेल्या भाषणात ‘मी लातूरचा खासदार असलो, तरी तुमच्या गावातूनच मला उमेदवारी (विनायक राख यांच्या मध्यस्थीने) मिळाली. त्यामुळे या परिसराचा विकास केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या माध्यमातून करू,’ असे जाहीर करताच उपस्थित भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली. दिवंगत गोपीनाथ मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या जनसमुदायासमोर गडकरींचे नाव घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला. मात्र, ज्येष्ठ नागरिकांनी धार्मिक कार्यक्रमात गोंधळ नको म्हणत गावकऱ्यांना शांत करीत गायकवाड यांना जाऊ दिले. मात्र, यानंतर निमंत्रण देणाऱ्या राख यांना गावकऱ्यांनी चांगलाच जाब विचारला. गोपीनाथ मुंडे यांचे नाव न घेता गडकरींचा उल्लेख करून गायकवाड यांना नेमके काय करायचे होते? ते कशासाठी आले? अशा प्रश्नांची सरबती गावकऱ्यांनी केली. गोपीनाथ मुंडे व गडकरी यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. या पाश्र्वभूमीवर गायकवाड यांनी गडकरींचा उल्लेख करताच संताप उफाळून आला.
या घटनेबाबत सरपंच भारत राख म्हणाले की, गावातील सप्ताहाच्या समारोपाला खासदार मुंडे यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे मोठय़ा संख्येने लोक आले. गावचेच मुंबईस्थित राख यांनी त्यांच्या व्यावसायिक संबंधातून गायकवाड यांना निमंत्रित केले. या बाबत आमच्याशी कसलीही चर्चा झाली नव्हती. धार्मिक कार्यक्रम असल्याने आम्हीही याकडे दुर्लक्ष केले. मात्र, गायकवाड यांनी दिवंगत मुंडे यांचा अपेक्षित उल्लेख न करता गडकरी यांचा उल्लेख करून विकासाचे स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न केला. मुंडे आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांना त्रास देणाऱ्यांकडून आम्हाला मदतीची गरज नाही. त्यामुळेच लोक संतप्त झाले. मात्र, धार्मिक कार्यक्रमामुळे लोक शांत राहिले.
‘भाजप नेत्यांचा हेतू काय?’
गोपीनाथ मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे सक्षम नेतृत्व करीत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कीर्तन महोत्सवात येऊन आपले राजकीय आदर्श अटलजी व अण्णा हजारे असल्याचे सांगितले. पण मुंडेंचा साधा उल्लेख केला नाही. आता लातूरचे खासदार गायकवाड जिल्ह्यात येऊन गडकरींच्या माध्यमातून विकास करू, असे सांगतात. यात भाजप नेत्यांचा हेतू काय? मुंडेंच्या निधनामुळे समर्थकांमध्ये दुख आहे. यातून ते अजून सावरले नाहीत. त्यात भाजप मंडळी अशा पद्धतीने वागत असल्याने मुंडे समर्थकांमध्ये संताप असल्याची प्रतिक्रिया अॅड. बाळासाहेब राख यांनी व्यक्त केली.