बीड : देशाची सध्याची स्थिती ही हुकूमशाहीसदृश असल्याची टीका करताना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना येथे लक्ष्य केले. इंदिरा गांधी यांनीही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत आव्हाड यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

बीडमध्ये बुधवारी संविधान बचाव महासभा झाली, या वेळी बोलताना आव्हाड यांनी वरील टीका केली. या सभेला माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील, तिस्ता सेटलवाड, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना अबू तालिब रहेमानी, ‘जेएनयू’ची विद्यार्थिनी दीपशिखा धर आदी उपस्थित होते.

आव्हाड यांनी देशातील सद्य:स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. हा संदर्भ देताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. आव्हाड म्हणाले की, इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देईल, असेही ते म्हणाले.