20 November 2019

News Flash

इंदू मिलमधील आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढणार

२०२० पर्यंत पुतळ्याचं काम पूर्ण होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे

दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा-शिवसेना सरकार सर्वोपतरी प्रयत्न करत असून दादरमधील इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे आता पुतळ्याची उंची एकूण ४५० फूट होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळ्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असल्याची माहिती दिली. तसंच २०२० पर्यंत पुतळ्याचं काम पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली. इंदू मिलमधील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. स्मारकात ग्रंथालय, ई-लायब्ररी विपश्यना केंद्र, सभागृह उभारण्यात येणार आहे

याआधी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 100 फुटाने कमी करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. तसंच चौकशी केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा दिला होता.

इंदू मिल येथे आंबेडकर स्मारकाच्या कामासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. तेथील झाडे तोडण्याची महापालिकेची परवानगी मिळविण्यात आली असून जमीन सपाटीकरणाचे काम करण्यात येत आहे. समुद्राचे पाणी इंदू मिलमध्ये येऊ नये यासाठी भिंत उभारण्याचेही काम करण्यात येत आहे. स्मारकासाठी 743 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिलमध्ये उभारण्यात येणारा पुतळा चीनमध्ये तयार करण्यात येत आहे. पुतळ्याचे सुटे भाग मुंबईत आणून जोडले जातील, अशी माहिती पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार यांनी दिली होती.

First Published on June 21, 2019 4:08 pm

Web Title: indu mill dr babasaheb ambedkar statue 100 ft cm devendra fadanvis monsoon session sgy 87
Just Now!
X