‘इथे उद्योग थाटले ते चुकलेच का?’

औरंगाबाद : वर्धित मूल्य धरून ३० हजार कोटींची उलाढाल असलेली आणि सरकारी तिजोरीत साडेचार हजार कोटी रुपयांचा कर भरणारी औरंगाबादची औद्योगिक वसाहत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उसळलेल्या हिंसाचारानंतर भयाच्या छताखाली उभी ठाकल्याचे शुक्रवारी दिसून आले.

चौकाचौकांत जाळलेल्या मालमोटारी, अग्निशामकाची गाडी, कोळसा झालेल्या दुचाक्या आणि खासगी कंपन्यांमध्ये घुसून केलेली दगडफेक आणि जाळपोळ यामुळे औद्योगिक विश्व भयकंपित झाले आहे. ‘अमेरिकेसारख्या देशात चांगल्या संधी असतानासुद्धा आपला गाव विकसित करायचा म्हणून आम्ही परतलो, उद्योग थाटले. तो आमचा निर्णय चुकीचा होता का,’ असा प्रश्न  रोहित दाशरथे या तरुण उद्योजकाने मांडला आहे. गुरुवारच्या मराठा आंदोलनादरम्यान, २० कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड तर केली गेलीच. काही ठिकाणी लुटालूटही झाली आहे. पोलिसांनी दुपापर्यंत तीन गुन्हे दाखल केले असून २० जणांना ताब्यात घेतले आहे. हिंसाचारात चार पोलीस किरकोळ जखमी झाले, तर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी नऊ अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

वाळूज एमआयडीसीकडे जाणाऱ्या एकमेव मार्गावर जळालेल्या ट्रकमधून सकाळपर्यंत धूर निघत होता. कंपन्यांच्या आवारात कागदपत्रे इतस्तत: पसरली होती. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये १२२९ उद्योगाचा कर जीएसटी कार्यालयात भरला जातो. त्यापैकी प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्यांना लक्ष्य करून  हल्ले करण्यात आल्याचे दिसून येत आहे. हल्लेखोर आंदोलकांपैकी १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले मद्यपान करून कंपनीच्या आवारात घुसून काचा फोडत होते आणि आगही लावत होते.

इन्डय़ुरन्स कंपनीचे नऊ युनिट औरंगाबादेत आहे. त्यातील सलग तीन युनिटमध्ये हल्ला करण्यात आला. पाचशेहून अधिकचा जमाव कंपनीच्या बाहेर आणि दीड-दोनशे तरुण आतमध्ये धिंगाणा घालत होते. या कंपनीच्या संशोधन आणि विकास शाखेच्या इमारतीला आतमधून आग लावून देण्यात आली. त्यामुळे बैठक कक्ष आणि स्वागत दालनात काजळी पसरली होती. खुच्र्या जळून खाक झाल्या होत्या. ही स्थिती केवळ एका कंपनीत नव्हती, तर स्टरलाइट, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, मायलॉन यासह बहुतांश कंपन्यांच्या इमारतीत दगडफेक झाली. या इमारतीचा समोरचा काचेच्या भागाची नासधूस केल्यानंतर आंदोलकांनी उत्पादन होणाऱ्या ‘अ‍ॅसेम्ब्ली लाइन’पर्यंत हिंसाचार केल्याचे इन्डय़ुरन्समधील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

वाळूजमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहावी म्हणून लावण्यात आलेल्या ९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील छायाचित्र पोलिसांनी मिळविले असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. प्रत्येक कंपनीमध्येही सुरक्षेच्या कारणासाठी लावलेल्या सीसीटीव्हीमधील छायाचित्रणही पोलिसांना उपलब्ध करून दिले जाईल. त्याआधारे प्रत्येक नासधूस करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी चेंबर ऑफ मराठवाडा आणि अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष राम भोगले यांनी केली. अशी मागणी करण्यापूर्वी उद्योजकांच्या बैठकीत घडलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यात आला. अशा हिंसाचाराच्या घटनांमुळे औरंगाबादमध्ये नियोजित दिल्ली-मुंबई औद्योगिक विकासपट्टय़ाच्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, औरंगाबाद, चाकण आणि नाशिक येथील हिंसाचाराच्या घटना दुपारनंतर घडायला सुरुवात झाली. औद्योगिक पट्टय़ात त्याचा जोर होता, यामागे काही सूत्र आहे, असा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीनेही तपास होईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आता आम्ही करावे तरी काय?

रस्त्याचे प्रश्न आम्ही उद्योजकांनी स्वत:हून सोडविले. झाडेसुद्धा आम्हीच लावली. आता आमची सुरक्षाही आम्हीच करायची का, त्यासाठी शस्त्रेही बाळगायची का, असा सवाल अमित कोरडे या उद्योजकाने केला. गुरुवारी जपानमधून एक जण कंपनीत आला होता. त्याला विमानतळावर पोचविण्यासाठी खूप कसरत करावी लागली. जाताना तो म्हणाला, ‘तुमच्या कंपनीचे मुख्य कार्यालय पुणे किंवा मुंबई येथे हलवा.’ सांगा काय करावे? असा सवाल त्यांनी केला.

लुटालूट आणि वाहनांची तोडफोड

वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्रमुख २० कंपन्यांमध्ये लोखंडी गेट तोडून सुरक्षा रक्षकाच्या दालनाची काच फोडणे, कंपनीचे लिहिलेले नाव काढून टाकण्यासाठी त्यावर घाव करणे, वाहनतळावर लावलेल्या गाडय़ा फोडणे असा प्रकार सर्रास सर्वत्र सुरू होता. वाहनांची तोडफोड एका बाजूला सुरू असताना काही कंपन्यांमधून मालही लुटला गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. आकार टूल्स या कंपनीत बनविले जाणारे ६० टन पाने आंदोलकांनी लुटून नेल्याची माहिती उद्योजकांच्या बैठकीत देण्यात आली.

‘उद्योजकांबरोबर बैठक घेऊ’

‘‘वाळूज औद्योगिक पट्टय़ात झालेल्या हिंसाचाराच्या अंगाने सुरक्षेसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांची दखल घेतली असून लवकरच औरंगाबादच्या उद्योजकांबरोबर बैठक घेऊ, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. गुंतवणुकीवर या घटनेचा परिणाम होईल का, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही.’’ गुरुवारी हिंसाचार करणाऱ्यांपैकी काही आंदोलकांनी मद्यपान केले होते, असे सर्व कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आवर्जून सांगत होते. वाळूजमध्ये १२ देशी, ४३ परमिट रूम, चार वाइनशॉप आणि सात बीअरशॉपी आहेत. त्या बंददरम्यान सुरू नव्हत्या, असा पोलिसांचा दावा असला, तरी मग मद्य उपलब्ध कोठून झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, हिंसाचार करणारे आंदोलक मराठा क्रांती मोर्चाचे नव्हते, असे सांगत समन्वयक विनोद पाटील यांनी या घटनेची राज्य गुन्हा अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र चौकशी केली जावी, अशी मागणी पत्रकार बैठकीत केली.