यंत्रमाग उद्योगासह अन्य उद्योग व्यावसायिकांना वाढलेल्या वीजदराच्या निषेधार्थ इचलकरंजी, विटा शहरांसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व यंत्रमाग केंद्रांमध्ये पाच दिवस सर्व उद्योग बंद ठेवण्यात येणार आहेत. हा बंद उद्यापासून सुरू होत असून उद्याच (गुरुवारी) प्रांताधिकारी कार्यालयावर एक दिवसाचे धरणे धरण्यात येणार आहे, अशी माहिती वीज ग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.
उद्यापासून सुरू होणारा बंद इचलकरंजी, वडगांव, कुरुंदवाड, रेंदाळ, विटा, माधवनगर आदी यंत्रमाग केंद्रांमध्ये होणार आहे असे या पत्रकात नमूद केले आहे. पत्रकात म्हटले आहे, की वीज दरवाढीच्या संदर्भात २३ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बठकीत चर्चा झाली. याबाबत मंत्री समितीने निर्णय घेण्याचे ठरले. पण अद्यापही मंत्री समिती घोषित झालेली नाही. त्यामुळे भिवंडी, मालेगाव अशा यंत्रमाग केंद्रे असलेल्या वस्त्रोद्योगात दहा दिवसांचा बंद जाहीर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी मोच्रे, धरणे आंदोलन जाहीर केले आहे.
त्याच धर्तीवर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील यंत्रमाग केंद्रामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, प्रताप होगाडे, दीपक राशिनकर, विनय महाजन, विश्वनाथ मेटे, सचिन हुक्किरे, किरण तारळेकर, गणेश भांबे, डी. एम. बिरादार आदींनी केले आहे.
भिवंडीत सहा लाख यंत्रमाग कारखाने बंद!
विजेच्या वाढत्या दरामुळे संतप्त झालेल्या भिवंडीतील यंत्रमाग कारखानदारांनी बुधवारी सहा लाख यंत्रमाग बंद ठेवून निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे शहरातील सुमारे १२ लाख कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यशासनाच्या वीज निर्मिती कंपनीचे सुमारे साडे चार हजार कोटीचे नुकसान भरून काढण्यासाठी १ सप्टेंबर पासून वीज ग्राहकांवर लादण्यात आलेल्या अतिरिक्त भारास विरोध करीत यंत्रमाग चालक-मालक बुधवारी संपावर गेले. सुमारे १२ लाख कामगारांना यामुळे कामबंद करावे लागले. येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडी पॉवर संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून हा संघर्ष सुरु ठेवण्यात येणार आहे.