तीन महिन्यांत ८३ बालमृत्यूची नोंद;  जिल्हा प्रशासनासह आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्यावर करोनाचे मोठे संकट ओढवले असतानाच जिल्ह्य़ात बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडल्याचे दिसून येत आहे.

पूर्वीचा ठाणे व आताचा पालघर जिल्हा स्वतंत्र विभाजन झाल्यानंतर येथे कुपोषणाबरोबरीने बालमृत्यू व मातामृत्यू मोठय़ा प्रमाणात फोफावले होते. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असले तरी बालमृत्यूचे हे प्रमाण कमी होत नसल्याने खंत व्यक्त होत आहे. करोनाच्या टाळेबंदीदरम्यान कुपोषणासह बालमृत्य व मातामृत्यूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिल ते जून महिन्यापर्यंत ८३ बालमृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या तीन महिन्यांत हीच आकडेवारी ६५ होती. याचाच अर्थ गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी या तीन महिन्यांत १८ बालमृत्यू अधिक आहेत.

टाळेबंदीदरम्यान गृहप्रसूती, रुग्णवाहिकांची गैरसोय, आरोग्य तपासण्यांमध्ये अडथळा तसेच विविध कारणांमुळे बालमृत्यूंचे प्रमाण वाढले आहे, असे सांगण्यात येत आहे. शून्य ते सहा वयोगटातील ही बालके विविध कारणांमुळे आणि आजारांमुळे मृत पावली असल्याचेही सांगितले जात आहे. असे असले तरी हा वाढत जाणारा आकडा प्रशासनाच्या चिंतेत आणखीन भर पाडत आहे. याच बरोबरीने यंदा एप्रिल ते जून अखेर चार मातामृत्यू झालेल्या आहेत. ही चिंतेची व गंभीर बाब आहे. गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यात ३०३ बालकांचा मृत्यू झाला होता, तर यंदा एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत ८३ बालकांचा मृत्यू झाला.

गेल्या पाच वर्षांत बालमृत्यू रोखण्यात प्रशासनाला फारसे यश आलेले नाही हे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. या पार्श्वभूमीवर बालमृत्यू थांबवण्यासाठी प्रशासनाने वेळीच प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात वाढत जाणारे बालमृत्यू हा चिंतेचा विषय असून यासाठी विविध यंत्रणा स्तरावर विशेष प्रयत्न करून हा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जातील, असे अलीकडेच जिल्ह्याचा दौरा केलेल्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

मातामृत्यू व बालमृत्यू या विषयाची गंभीरता लक्षात घेत या संदर्भात विशेष उपाययोजना म्हणून सर्व यंत्रणांची बैठक घेण्यात आली होती. विविध कारणांमुळे आणि आजार यांमुळे हे बालमृत्यू झाले असले तरी शासनाच्या या संदर्भातील विशेष योजना, गृहभेटी राबवून आणि आरोग्यासंबंधीच्या तपासण्या तातडीने करून बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन नक्कीच विशेष प्रयत्न करेल. त्यातून हा आकडा कमी होईल, असा विश्वास आहे.

– डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर