लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर: पुण्याहून विमानाने नागपूरला परतलेल्या एका दाम्पत्याचा हातावर होम क्वारंटाइन शाईचा शिक्का प्रशासनाने मारला होता. परंतू दुसऱ्या दिवशी त्यातून स्त्राव निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यामुळे दोघेही घाबरले असून, डॉक्टरांनी त्यांना शाईचा संसर्ग झाल्याची प्राथमिक शंका वर्तवली.

५ जून रोजी पुण्यातून इंडिगो विमानाने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे दाम्पत्य दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी उतरले. स्नेहा मून आणि राकेश मून असे या दाम्पत्याचे नाव आहे. विमानातून उतरल्यानंतर पती- पत्नी दोघांच्याही हातावर खबरदारीचा उपाय म्हणून गृह विलगीकरण करण्याचा सूचना देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या हातावर सील (शिक्का) लावले गेले. हे दाम्पत्य काही वेळ नागपुरात आपल्या नातेवाईकांकडे होते. यानंतर कारने चंद्रपूरकडे रवाना झाले.

६ जून रोजी शाई मारलेल्या भागातून स्त्राव निघत असून त्याला खाज सुटल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. हे दाम्पत्य घाबरले आहे. त्यांनी तातडीने  डॉक्‍टरांना दाखवले. डॉक्‍टरांनी संसर्ग झाल्याचा अंदाज वर्तवला. दरम्यान शाईसंदर्भात विचारणा केली असता, महसुल विभागाकडून मिळालेली ही शाई आहे. निवडणुकीदरम्यान मत दिल्यानंतर बोटावर जी शाई लावतात, ती शाई असल्याची माहिती मिळाली. या दाम्पत्यांने शाईचा संसर्ग झाल्याची माहिती नागपूरच्या नातेवाईकाला दिली. विशेष असे की, दोघांच्याही हातावर संसर्ग झाला असल्याची माहिती मिळाली आहे.