पूर्व विदर्भातील जंगलात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी आता पश्चिम विदर्भातील मेळघाटच्या जंगलात स्वत:चा ’बेस’ निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून अलीकडच्या काळात मिलिंद तेलतुंबडे उर्फ दीपकने या भागात अनेक बैठका घेतल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या ३० वर्षांपासून पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या चार जिल्हय़ात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी अलीकडच्या काही वर्षांत शहरी भागात संघटनात्मक हालचाली सुरू केल्या आहेत. शहरी भागासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणाऱ्या नक्षलवाद्यांना पूर्व विदर्भातील जंगल सोडून राज्याच्या इतर भागात असलेल्या जंगलात मात्र आजवर बस्तान बसवता आले नव्हते. इतर भागातील जंगलात सुद्धा चळवळ सक्रिय करण्याच्या दृष्टीने नक्षलवाद्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यांना स्थानिकांकडून योग्य ते पाठबळ मिळू न शकल्याने या प्रयत्नांना यश आले नव्हते.
या पाश्र्वभूमीवर आता मिलिंद तेलतुंबडेने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. नक्षलवाद्यांच्या राज्य समितीचा सचिव असलेला मिलिंद तेलतुंबडे उत्तर गडचिरोली गोंदिया बालाघाट या विभागात गेल्या काही वर्षांपासून सक्रिय आहे. जंगलात तो दीपक या नावाने वावरतो. जंगल तसेच शहरी भागाची जबाबदारी सुद्धा शिरावर असलेल्या मिलिंदने गेल्या काही महिन्यात मेळघाटात बैठका घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्याच्या हालचालीवर बारीक नजर ठेवून असणाऱ्या गुप्तचर संघटनांमधील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मिलिंदने गेल्या तीन महिन्यात अमरावतीजवळ असलेल्या बडनेराला अनेकदा भेटी दिल्या. या भेटीत त्याने आदिवासींसोबतच मागासवर्गातील तरूणांच्या काही बैठकी आयोजित केल्या. याच काळात तो मेळघाटला सुद्धा अनेकदा जाऊन आला. तिथेही त्याने काही बैठकांचे आयोजन केले होते.
 व्यवस्थेविरूद्ध क्रांतीच्या मार्गाने लढा देण्यासाठी तरूणांनी या चळवळीत सामील व्हावे असे आवाहन त्याने या बैठकांमधून केल्याची माहिती आहे. अतिवजनामुळे मिलिंद तेलतुंबडेला चालण्याचा त्रास आहे. याच कारणावरून त्याची प्रकृती सुद्धा खराब असते. बडनेरा व मेळघाटच्या दौऱ्यात त्याने या आजारावर उपचार सुद्धा करून घेतल्याची माहिती आहे. तीन वर्षांपूर्वी मिलिंदने जळगाव जिल्हय़ातील भुसावळ येथील एका रूग्णालयात उपचार करून घेतले होते. खास त्याच्यासाठी तसेच चळवळीतील इतर सदस्यांच्या उपचारासाठी नक्षलवाद्यांसाठी शहरात काम करणाऱ्या सदस्यांनी भुसावळला तळ ठोकला होता. ही माहिती गुप्तचर यंत्रणांकडे उपलब्ध आहे.
 मेळघाटमध्ये चळवळीचे बस्तान बसवता यावे यासाठी मिलिंदने अमरावती राहणाऱ्या भोवते दांपत्याला चळवळीत मोठी जबाबदारी दिली होती. दोन वर्षांपूर्वी हे दाम्पत्य गोंदिया पोलिसांच्या जाळय़ात अडकले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद त्या काळात बरेच दिवस अमरावतीत तळ ठोकून होता. भोवतेला अटक झाल्यानंतर नक्षलवाद्यांचे अमरावती केंद्र विस्कळीत झाले होते. पोलिसांची पाळत असल्यामुळे मिलिंद सुद्धा अमरावतीपासून दूर होता. आता पुन्हा त्याने या भागात दौरे करणे सुरू केल्याने गुप्तचर यंत्रणा सावध झाल्या आहेत.