पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढीला लागल्याचे निदर्शनास आले असून कृषी विद्यापीठाने कापूस उत्पादक भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ापासून ऑक्टोबर मध्यापर्यंत शेंदरी बोंडअळी नियंत्रणाखाली होती, प्रादुर्भाव बहुतांश भागात नगण्य होता. शेतकऱ्यांनी फेरोमोन ट्रॅप्सचा (कामगंध सापळे) वापर जुलै-ऑगस्टपर्यंत चांगल्या रीतीने केला. नंतर बोंडअळी संपुष्टात आली असे समजून सध्या शेतकऱ्यांच्या शेतात फेरोमोन ट्रॅप्सही नाहीत व निरीक्षणे घेणेसुद्धा बंद झाले आहे, परंतु अलीकडच्या काळात म्हणजे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवडय़ात यवतमाळ, अकोला व अमरावती जिल्ह्यात शेंदरी बोंडअळी प्रादुर्भावास सुरुवात झाली आहे. जवळपास इतर जिल्ह्यत काही ठिकाणी १० ते २० टक्क्यांपर्यंत शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव निदर्शनास आला आहे.

सध्या दिवसाच्या तापमानात आद्र्रतेचे प्रमाण जास्त व रात्रीच्या थंडीत झालेली वाढ ही स्थिती बोंडअळीस पोषक असल्याने अमरावती  जिल्ह्यासह विदर्भात प्रादुर्भाव वाढत आहे. कीटकशास्त्र विभाग व गुलाबी बोंडअळी सनियंत्रण समितीमधील कीटकशास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये हिरव्या बोंडात १० टक्क्यांच्या वर प्रादुर्भाव आढळून आला. अमरावती जिल्ह्यतील नया अकोला येथे कोरडवाहू कपाशीमध्ये सुद्धा पाच टक्के प्रादुर्भाव दिसून आला. कृषी विद्यापीठाने विदर्भात सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बोंडअळीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कपाशी, हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याचा ताण पडलेल्या कपाशीच्या तुलनेत संरक्षित ओलिताच्या कपाशीत व भारी संपूर्ण सिंचनाखाली असलेल्या जमिनीत हिरव्या बोंडामध्ये जास्त प्रादुर्भाव राहण्याची शक्यता आहे. यावर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या ते ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत दिवसाचे सरासरी तापमान ३५ अंश सेल्सिअस असल्याने अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास अटकाव झाला होता. मात्र आता तापमान जसजसे कमी होईल तसतसा हिरव्या बोंडातील गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावात वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी गाफील न राहता वेळीच जागरूक होऊन प्रथम गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावासाठी दर आठवडय़ाला नियमित सर्वेक्षण करून फेरोमोन सापळ्यातील पतंग दररोज मोजून नष्ट करावे. सापळ्यातील कामगंध आमिष (ल्यूर) वेस्टनावरील सूचनेनुसार दर वीस दिवसांनी बदलून प्रती एकरी सहा ते आठ कामगंध सापळे लावून मोठय़ा प्रमाणात अडकलेले पतंग नष्ट करणे गरजेचे आहे. दर आठवडय़ाला शेताचे प्रतिनिधित्व करतील, अशी एकरी वीस झाडे निवडून त्या प्रत्येक झाडावरील एक बोंड याप्रमाणे मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले आणि बाहेरुन कीड नसलेले असे २० बोंडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने ठेचून त्यामध्ये किडके बोंड व अळ्यांची संख्या मोजावी यापैकी दोन किडक बोंडे किंवा दोन पांढुरक्या गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी समजून ‘लेबल क्लेम’ शिफारशीप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास त्वरित करावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या येथील प्रादेशिक संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल ठाकरे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.