सतीश कामत, रत्नागिरी

ग्रामीण भागातील भावी पिढीवर विज्ञानाच्या संस्कारांचे कार्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेरूर येथील वसुंधरा विज्ञान केंद्र गेली सुमारे दोन दशके चिकाटीने करत आहे. भविष्यात कायमस्वरूपी सुसज्ज प्रयोगशाळेपासून तारांगणापर्यंतचे भव्य स्वप्न साकार करण्यासाठी संस्थेला निधीची गरज आहे.

कुडाळपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या या संस्थेच्या प्राथमिक उद्दिष्टाला अनुसरून विज्ञानाची मूलभूत तत्त्वे शालेय विद्यार्थ्यांना सहज करता येतील अशा प्रयोगांमधून समजावून सांगितली जातात. त्यासाठी फिरत्या प्रयोगशाळेबरोबरच संस्थेच्या आवारातील ‘युरेका हॉल’ या सभागृहात सुमारे ३५-४० विविध प्रकारचे प्रयोग करून दाखवले जातात. नवनवीन वैज्ञानिक विषयांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी टॅबचा वापर केला जातो. शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग, शिबिरे, अवकाश दर्शन, शैक्षणिक खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञानाशी मैत्री असे विविध उपक्रम राबवले जातात. मोकळ्या जागेत उभारलेले डॉ. होमी भाभा सायन्स पार्क, फुलपाखरांचे उद्यान, औषधी वनस्पती उद्यान, फिरत्या प्रयोगशाळेबरोबरच फिरते वाचनालय, हे आणखी काही वेगळे उपक्रम ‘वसुंधरा’तर्फे राबवले जात आहेत. या उपक्रमांच्या विस्ताराबरोबरच काही नवीन योजना राबवण्याचा संस्थाधुरीणांचा संकल्प आहे.

सध्या फिरत्या प्रयोगशाळेचा लाभ दर वर्षी सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना होतो. जास्त निधी उपलब्ध झाला तर अशीच दुसरी फिरती प्रयोगशाळा उभी करून दर वर्षी आणखी काही हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मनोदय आहे. याचबरोबर भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा उभारणीचे कामही प्रगतिपथावर असून त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या धर्तीवर कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांसाठी केंद्र शासनाची किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना आहे. निधी उपलब्ध झाल्यास या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठीही काम करणे शक्य होणार आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संकल्पना सर्वसामान्य समाजापर्यंत, विशेषत: विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक कुतूहल आणि सर्जनशीलता निर्माण करण्यासाठी ‘सायन्स पार्क’ उभारण्याची योजना आहे. समाजातील दानशूर व्यक्ती किंवा संस्थांनी मदतीचा हात पुढे केल्यास हे सर्व संकल्प सिद्धीस नेण्याचा संस्थेचा मनोदय आहे.