सोलापूर : भटक्या जाती-जमाती, वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महेश आणि विनया निंबाळकर दाम्पत्याने बार्शीमध्ये स्नेहग्राम प्रकल्प सुरू केला. सध्या प्रकल्पातील विद्यालयात ४० मुले शिकत आहेत. प्रकल्पाच्या कार्यविस्तारासाठी वंचितांचा आधारवड ठरलेल्या या प्रकल्पाला आर्थिक आधाराची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भटक्या जमातींसह स्थलांतरित, अनाथ, वंचित, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची मुले, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांचे प्रश्न लक्षात घेऊन निंबाळकर दाम्पत्याने बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील माळरानावर हा प्रकल्प सुरू केला. औपचारिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधिष्ठित शिक्षण व व्यावहारिक जीवनानुभव देण्यावर स्नेहग्रामने भर दिला आहे.

निंबाळकर दाम्पत्याच्या धडपडीतून चाललेल्या या कार्याची माहिती ‘आनंदवन’चे डॉ. विकास आमटे व कौस्तुभ आमटे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी या कामाचे कौतुक करून मदत करण्याबरोबरच ‘स्नेहग्राम’ला आकार मिळवून दिला. समाजातील इतर संवेदनशील मंडळींनीही मदतीचा हातभार लावला.

सध्या ‘स्नेहग्राम’मध्ये ४० मुले निवासी शिक्षण घेतात. त्यासाठी दरमहा एक लाखापर्यंत खर्च होतो. पत्र्याच्या दोन खोल्यांमध्ये ही शाळा चालते. या दोन खोल्यांमध्येच पाच वर्ग भरतात. या दोन खोल्यांमध्येच या मुलांची राहण्याची सोय करावी लागते. भटक्या, गरजू मुलांची संख्या मोठी आहे. या मुलांनाही या प्रकल्पाच्या छत्रछायेची गरज आहे, पण आर्थिक आधाराअभावी व्यवस्था उभी करणे चालकांना शक्य होत नाही. देणगीदारांनी सढळ हातांनी मदत केल्यास या प्रकल्पात जवळपास ५०० वंचित मुलांसाठी शिक्षण देण्याची व्यवस्था उभी करता येणे शक्य होईल, असा विश्वास निंबाळकर दाम्पत्याने व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information article about ngo ajit foundation
First published on: 19-09-2018 at 04:36 IST