प्रशांत देशमुख

वर्धा : करोनामुळे वर्गखोल्यांची दारे बंद झाल्याने ऑनलाईनचा एकमेव पर्याय आला. मात्र हा ‘नाईलाजाचा’ पर्याय असल्याची भावना दूर करण्याचा व शिक्षण सुगम्य करण्याचा उपक्रम व्हिडीओ मालिकेच्या माध्यमातून सादर केल्यावर राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या त्यावर उडय़ा पडत असल्याचा अनुभव पुढे आला आहे.

वर्गखोल्या बंद व शिक्षक दुरापास्त झाल्याने शासनानेच ऑनलाईन माध्यम अध्ययन व अध्यापनासाठी पुरेसे मानले. मात्र त्याबद्दल असंख्य तक्रारी आहेच. पण याच माध्यमातून शिकवणे अपरिहार्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर ते अधिक प्रभावी करण्याचे उत्तर आष्टीच्या हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयातील शिक्षक व उपक्रमशील म्हणून परिचित वीरेंद्र कडू यांनी शोधले. यावर्षी नववीतून दहावीत ‘ढकलल्या’ गेलेल्या विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तक गवसलेच नाही. परिणामी, अभ्यासाची रूची कमी झाली. अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षी शालांत परीक्षा द्यायची असल्याने त्यांची घरबसल्या तयारी करून घेणारा उपक्रम कडूंनी तयार केला. मराठी विषयाच्या वीस अभ्यासघटकांवर वीस ‘व्हिडीओ’ तयार करण्यात आले आहे. अभ्यासघटकाच्या मध्यवर्ती विषयाला अनुरूप अ‍ॅनिमेशन कलेचा वापर करून प्रसंगचित्रे समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पद्य आणि गद्य अभ्यासघटकांतील पाठनिहाय लेखक, कवी, कवियित्री यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी थेट संवाद घडतो. दहावीच्या अभ्यासक्रमात अरुणिमा सिन्हाची थरारक वास्तव घटना आहे. तिची मुलाखत, अपघात व माऊंट एव्हरेस्ट सर करतानाचे सर्व प्रासंगिक छायाचित्र ‘व्हिडीओ’त आले. अभ्यासक्रमात असलेल्या विषयावरील डॉ. शि.गो. देशपांडे व भारतरत्न महर्षी धोंडो केशव कव्रे यांच्या अत्यंत दुर्मिळ चित्रफि ती व माहितीपट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. १९७६ ला प्रदर्शित ‘आराम हराम है’ या मराठी चित्रपटातील ‘आकाशी झेप घे रे’ हे गीत अभ्यासक्रमात आहे. ‘व्हिडीओ’त गीताचा आशय व त्यावरील कवी जगदीश खेबुडकर यांचे भाष्य विद्यार्थ्यांना आपलेसे करणारे ठरते. रंजन व अध्ययन असा दुहेरी हेतू साध्य झाल्याचे मत कडू यांनी व्यक्त केले. सर्व मुलाखती त्यांनी गुगलच्या माध्यमातून संकलित केल्या.

कडू यांनी संवाद अकादमी या युटय़ूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर हा पर्याय उपलब्ध करून दिला. राज्यातील १६० पेक्षा अधिक विद्यालयात त्याचा लाभ घेणे सुरू झाले आहे. वीस जिल्हय़ात या उपक्रमावर विद्यार्थ्यांच्या उडय़ा पडत असल्याची नोंद झाली आहे. ग्रामीण भागासाठी ऑनलाईन अडचणीचे असल्याचे म्हटल्या जाते. मात्र पालकांजवळ असलेल्या भ्रमणध्वनीवर उपलब्ध असलेले हे व्हिडीओ विद्यार्थी दिवसातून केव्हाही पाहू शकतो. सरळसोट अभ्यासक्रम सांगणारा व्हिडीओ नसल्याने व चित्रपटाप्रमाणे सादरीकरण झाल्याने विद्यार्थ्यांचा तो सहज पचनी पडत असल्याचे काही पालक सांगतात. अभ्यासक्रमासाठी असंख्य व्हिडीओ उपलब्ध आहेत. मात्र या उपक्रमात वेगळय़ा पद्धतीने सादरीकरण झाल्याने राज्यातील दहा हजारांवर विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेत असल्याचे मत शिक्षक वीरेंद्र कडू यांनी व्यक्त केले. प्रत्येक अभ्यासघटकावर पाच असे वीस घटकांवर एकूण शंभर प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवण्यास देण्यात आले आहे. स्पर्धात्मक परीक्षेचा परिचय व्हावा म्हणून यात उणे गुणदान पद्धत वापरली आहे. मुख्याध्यापक, शिक्षक व पालक शाळा किंवा घरी बसून ही अभ्यासप्रणाली अंमलात आणू शकतात.