टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने पंढरी नगरी नेहमी दुमदुमलेली असते. मात्र करोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन केले आहे. पंढरपुरात विनाकारण फिरणाऱ्यांचे पोलिसांनी अनोखे प्रबोधन केले. दुचाकीस्वारांना कपाळी बुक्का लावून अभंग गायला लावले. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.
देशात करोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन केले आहे. लोकांनी बाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे. मात्र काहीजण विनाकारण बाहेर पडत आहे. अशा लोकांना पोलिसी दंडुक्याचा प्रसाद मिळाला. मात्र यातून काहींनी बोध घेतला मात्र अनेकजण विनाकारण बाहेर पडत आहे.
पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी अनोखी शक्कल लढवली. शहरातील मुख्य ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना थांबवले. रणजीत पाटील, अभिजित कांबळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी कपाळावर बुक्का लावला. तर प्रसाद औटी यांनी हरिपाठ आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग यांनी गायला. त्या पाठोपाठ नागरिकांनाही म्हणण्यास सांगितले. त्यानंतर विठुरायाच्या जयघोष उपस्थित पोलीस आणि नागरिकांनी केला. करोना आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन वारंवार केले. लाठीचा वापर केला तरी लोक बाहेर पडत आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रबोधन केले असून कृपया नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले आहे. या पोलिसांच्या अनोख्या प्रबोधनाचा फरक पडेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 2, 2020 12:35 am