पुण्याहून सोलापूरकडे जाणारी इनोव्हा कार आणि सोलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात १ महिला जागीच ठार झाली तर ९ जण जखमी झाले. मोहोळपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ हा अपघात झाला. या घटनेतील दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे अशीही माहिती समोर आली आहे. अफसानाबानू मोहम्मद जाविद नावाची महिला या घटनेत जागीच ठार झाली आहे.

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास आंध्रप्रदेशातून नाशिककडे निघालेला ट्रक क्रमांक टी. एन. ४६ एस ७९ आणि पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघालेली इनोव्हा कार क्रमांक टी. एन. १२ ई. ई. ३९२४ यांची चंद्रमौळी वसाहतीजवळ धडक झाली. या घटनेत अफसानाबानू मोहम्मद जाविद ही हैदराबाद येथील चारमिनार भागात राहणारी महिला जागीच ठार झाली.

मोहम्मद जाविद (वय ४५), अमीनाबानू मोहम्मद इब्राहिम (वय १७), मुबिनाबानू मोहम्मद इब्राहिम (वय ३५), मोहम्मद बिलाला मोहम्मद जाविद (वय २०), मोहम्मद उसामा मोहम्मद इब्राहिम (वय १४), समाधराबानू मोहम्मद जाविद (वय १२), सबीनाबानू मोहम्मद जाविद (वय ४०), सुहाबानू मोहम्मद जाविद (वय ८) हे जखमी झाले आहेत. हे सगळेजण हैदराबाद येथील चारमिनार परिसरातलेच रहिवासी आहेत. अमीनाबानू मोहम्मद इब्राहिम आणि आणखी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नरेंद्र मस्के, स. पोलीस निरीक्षक नागराज निंबाळे, पोलीस नाईक सुभाष गोरे, हरिदास आदलिंगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच जखमींना तातडीने रूग्णालयात दाखलही केले. ट्रकचालक मन्नीवन रामन्ना याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स. पोलीस निरीक्षक नागराज निंबाळे हे या घटनेचा शोध घेत आहेत.