मिरजेत साथीच्या आजारात बळी पडलेल्या रूग्णांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितली. प्रसिध्दी माध्यमातून गॅस्ट्रोमध्ये बळी गेलेल्या रूग्णांची संख्या १३ असली तरी महापालिका प्रशासन केवळ दोघांचा बळी गेल्याचे सांगत असल्याने संभ्रमावस्था दूर करण्यासाठी ही समिती नियुक्त करण्यात आली आहे.
मिरजेच्या ब्राह्मणपुरी, विजापूर वेस, कोकणे गल्ली, सहारा कॉलनी, पंचशील नगर, शास्त्री चौक आदी ठिकाणी गेल्या १५ दिवसापासून गॅस्ट्रो, अतिसार या साथीच्या आजाराने थमान घातले होते. शेकडो रूग्ण उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाले होते. प्रसिध्दी माध्यमातून गॅस्ट्रोची भयावहता लक्षात आणताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने महासव्‍‌र्हेक्षण करून नेमकी वस्तुस्थिती जाणून घेउन उपाय योजना केली.
साथग्रस्त भागात प्रतिबंधक उपायासोबत स्वच्छता, गटारीतून दिले गेलेली नळ जोडणी, वॉशआउट करीत ओआरएस पाकिटाचे आणि मेडिक्लोअरचे वाटप करण्यात आले. रूग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत असतानाच साथ आटोक्यात आणण्यासाठी धोकादायक नळकनेक्शन तोडण्यात आली.
गॅस्ट्रोमुळे १३ रूग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसिध्दी माध्यमातून प्रसारित होत असताना महापालिका प्रशासन मात्र केवळ दोघांचा मृत्यू गॅस्ट्रोने झाला असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेत सांगत आहे. याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता गेल्या १५ दिवसात जे रूग्ण मृत झाले त्यांच्या मृत्यूमागे कोणते कारण आहे याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नियुक्त करण्यात आली असल्याचे सांगितले. या समितीचा अहवाल आल्यानंतरच गॅस्ट्रोचे बळी निश्चित होणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, जिल्ह्यातील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आली असून प्रशासनाने साथीवर नियंत्रण मिळविले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले. साथीचे ग्रामीण भागातही रूग्ण आढळून येत असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानेही प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.