रायगड जिल्ह्य़ात खारलॅण्ड विभागामार्फत खारभूमी योजना राबविल्या जातात. या योजना राबविताना मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने या सर्व योजनांची सखोल चौकशी करण्याची मागणी जनजागृती ग्राहक मंचाने केली आहे. खारलॅण्ड विभागाकडून शहाबाज, पाल्हे नागेश्वरी, सुडकोली, नवेदर बेली, नांरगी, कवाडे, नवीन मिळकतखार, कुंदे, फोफेरी, वरसगाव या खारभूमी योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र यात लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप जनजागृती ग्राहक मंचाने केला आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील ३५ पकी १४ योजनांच्या सखोल चौकशीची मागणी संस्थेकडून केली जाते आहे. विशेष म्हणजे निष्पक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी खारभूमी विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कारण या विभागातील दोन वरिष्ठ अधिकारी गेली अनेक वर्षे एकाच पदावर कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी ठरावीक कालावधीच्या वर कार्यरत राहता येत नाही. मात्र हे दोन्ही अधिकारी सातत्याने अलिबाग आणि पेण विभागात कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ठेकेदार आणि त्याचे हितसंबंध जोपासले जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा आरोपही जनजागृती ग्राहक मंचाचे जिल्हा सचिव मंगेश माळी यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागूनही माहिती देण्यास या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे खारभूमी योजना आणि संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माळी यांनी केली आहे. या संदर्भात खारलॅण्ड सचिव आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे लेखी तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.