नगरोत्थान योजनेतून शहरात बसवण्यात आलेल्या पथदिव्यांची आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणवत्ता नियंत्रण मंडळाकडून तपासणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात बहुचर्चित पाइपलाइन रस्त्यावरील पथदिव्यांची तपासणी आणि चौकशी होणार असून, महानगरपालिकेने त्यासाठी २ लाख ५१ हजार ६१३ रुपये शुल्कही भरले आहे.
या कामाची चौकशी करण्याबाबतचे पत्र आणि हे शुल्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (विद्युत विभाग) मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार येत्या आठ-पंधरा दिवसांत ही तपासणी आणि चौकशी सुरू होणार असून पुढच्या महिन्या-दोन महिन्यांत त्याचा अहवाल अपेक्षित आहे.
गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून शहरात हा विषय गाजतो आहे. मनपाने नगरोत्थान योजनेतून शहरात पथदिव्यांची काम केली असून, त्यापोटी आत्तापर्यंत सुमारे ७ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याचे समजते. पाइपलाइन रस्त्यावरील कामासाठी ५० लाख ३२ हजार ६२२ रुपये अदा करण्यात आले असून हेच काम वादग्रस्त ठरले आहे. या कामाबाबत गैरव्यवहाराच्या तक्रारी झाल्या आहेत. सन्माननीय नागरिक प्रतिष्ठान आणि युगंधर युवा प्रतिष्ठान यांनी या तक्रारी करून चौकशीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामुळेच गेले वर्षभर हा विषय गाजतो आहे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार सुरुवातीला अभियांत्रिकी महाविद्यालयाला या पथदिव्यांच्या तपासणीचे काम देण्यात आले होते. त्यांनीही काही काळ चालढकलच केली. मात्र नंतर केलेल्या तपासणीतही या संस्थेने त्रुटीच ठेवल्या, असा या संघटनांचा आक्षेप आहे. शिवाय हा अहवालही मनपाने दडपला होता. त्यावर कोणतीही कार्यवाही होत नव्हती, असे सन्माननीय नागरिक प्रतिष्ठानचे प्रमोद मोहळे यांनी सांगितले. त्यामुळेच दुसऱ्या सक्षम यंत्रणेकडून ही तपासणी करण्याची मागणी या संघटनांनी केली होती. त्याचा सतत पाठपुरावाही सुरू होता. मनपाची ही टाळाटाळ लक्षात घेऊन अखेर याबाबत पोलिसात फिर्याद दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर मात्र मनपाला खडबडून जाग आली. गेल्या दि. ३० मार्चलाच मनपाने या चौकशीबाबतचे पत्र देऊन तपासणीचे शुल्कही भरले आहे. मात्र केवळ पाइपलाइन रस्ताच नव्हे, तर शहरातील या पूर्ण कामाची तपासणी करण्याची मागणी या संघटनांनी केली असून पुढच्या टप्प्यात ही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.