सांगली : जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून या मृत्यूप्रकरणी पोलीस ठाण्यातही आकस्मिक मृत अशी नोंद करून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे यांनी सांगितले. मृतदेहाची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येत असून अहवालानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण समोर येईल असे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या २४ वर्षीय प्रियांका सुनील चव्हाण या गरोदर महिलेचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच झाला असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत बुधवारी रुग्णालयात गोंधळ धातला. रुग्ण महिला  प्रियांका चव्हाण यांना नऊ महिने पूर्ण होऊन देखील डॉक्टरांनी तीन दिवसांपासून दाखल करून न घेता इकडच्या -तिकडच्या वार्डात जावा असे सांगितले जात होते. यामध्येच काल सायंकाळच्या सुमारास रुग्णालयाच्या बाहेर असताना प्रियांकाला त्रास सुरू झाला आणि तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोवर तिचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला.

दरम्यान, याबाबत नातेवाईकांची तक्रार लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली असून महिलेची रुग्णालयात गेले दोन दिवस चाललेली हालचाल, तिच्यावर करण्यात आलेले उपचार, ती दुचाकीवर बसून गेल्याची दृश्यफीत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. तसेच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून यामध्येही मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अहवाल मागविण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उगाणे यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यी समिती नियुक्त करण्यात आली असून या समितीला २४ तासांत अहवाल देण्यास सांगण्यात आले असल्याचे अधिष्ठाता डॉ. श्रीमती सापळे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. या अहवालात जर डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याचे आढळून आले तर संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

 

प्रियांका चव्हाण