आगामी लोकसभा निवडणुकीत देशामध्ये भाजपचे सरकार येणार व मोदी पंतप्रधान होणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ असून, राज्यातही महायुतीचे सरकार येणार आहे. त्यांनतर तालुक्याची व शेतकऱ्यांची कामधेनू असणारा जगदंबा सहकारी साखर कारखान्याच्या संशयास्पद विक्रीची, प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी करायला लावू, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. राम शिंदे यांनी केले.
नगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचाराची सभा तालुक्यातील कुळधरण येथे झाली. त्यावेळी उमेदवार गांधी, शिवसेनेचे तालुका प्रमुख बळीराम यादव, युवासेनेचे दीपक शहाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, रासपचे जिल्हाध्यक्ष मेजर हाके, कैलास शेवाळे, शांतीलाल कोपनर, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. शिंदे म्हणाले की, एखाद्या ग्रामपंचायतीने केलेल्या आठवडे बाजाराच्या लिलावासारखा हा कारखाना अजित पवार यांना देण्यासाठी जिल्हा बॅकेंने व्यवहार केला आहे. हा सर्व व्यवहार संशयास्पद आहे. तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांनी घरातील माउलीच्या अंगावरील दागिने मोडून या कारखान्याचे शेअर्स खरेदी केले. त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले. कारखाना पवार यांनी इंडीकॉनच्या नावाखाली घेतला असला तरी पवार यांच्याकडे येवढा पैसा कोठून आला याची चौकशी आमचे सरकार आल्यावर करण्यात येईल. जनता आता कॉग्रेसच्या महागाई, भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. त्यांचे अपराध भरले आहेत. आता त्यांना माफी नाही. गांधी यांनीच खेडयापाडयातील लोकांना खासदार काय असतो हे दाखवले. यावेळी त्यांची मंत्री म्हणून वर्णी लागणार आहे, समोरचा उमेदवार आजच त्यांच्याच कार्यकर्त्यांंना भेटत नाही. त्यांच्या पीएबरोबर आधी बोलावे लागते व त्यांना वाटले तर मग आपले बोलणे होणार या पेक्षा आपले साधे गांधी बरे असे शिंदे म्हणाले.
यावेळी गांधी, बापूसाहेब चव्हाण, राहुल जामदार, अल्लाउदिन काझी, शेवाळे, खेडकर यांची भाषणे झाली. कुळधरण परीसरातील पै. भाउसाहेब सुपेकर, अतुल जगताप, नवनाथ जगताप, दत्तात्रय गजरमल व बाळासाहेब सुपेकर आदींनी पक्षात प्रवेश केला.