शहरात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे वाढत आहेत. इठलापूर मोहल्ल्यात जुनी विहीर बुजवून महापालिकेच्या एका सदस्याने तेथे कार्यालय थाटले, तर राष्ट्रीय महामार्गावरील बसस्थानकासमोर १५ ते २० फुटांचे अतिक्रमण करून एका धार्मिक स्थळाचे नव्याने बांधकाम करण्यात आले. अतिक्रमणधारक व महापालिका यांच्या संगनमताने होत असलेल्या अतिक्रमणाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार संजय जाधव यांनी केली.
शहरातील अतिक्रमणांबाबत जाधव यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन लक्ष वेधले. शहरात ठिकठिकाणी कायद्याचे सर्रास उल्लंघन करून काही व्यक्ती अतिक्रमण करीत आहेत. अतिक्रमणासोबतच महापालिकेच्या जलतरणिकेबाबत मनमानी कारभार चालू आहे. कुठलीही निविदा न काढता ही जलतरणिका ठेकेदार चालवत आहे. गेल्याच आठवडय़ात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेस ठेकेदाराइतकेच मनपाही जबाबदार आहे. या गरप्रकाराचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी जाधव यांनी केली.
शहरात वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. वाहतूक नियमाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मुख्य बाजारपेठेत वाहन पार्किंगची व्यवस्था नाही. शहरातील मुख्य ठिकाणच्या चौकात बसविलेले सिग्नल मागील काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले. शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी सम-विषम तारखेप्रमाणे मार्गाची रचना करावी, अशी मागणी त्यांनी केली. निवेदनावर जाधव यांच्यासह जिल्हाप्रमुख संदीप भंडारी, अतुल सरोदे, अनिल डहाळे, उदय देशमुख आदींच्या सहय़ा आहेत.
‘गारपीटग्रस्तांना अनुदान द्या’
गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला. जिल्ह्यात ३ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे नुकसान झाले. पकी १ लाख ३६ हजार २७६ हेक्टर क्षेत्र गारपिटीमुळे बाधित झाले. राज्य सरकारने अनुदान जाहीर केले असले, तरी अनेक गावच्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेरसर्वेक्षण करून भरपाई द्यावी, अशी मागणीही आमदार जाधव यांनी केली.