चार किलोमीटरच्या पट्टय़ात वेगाने प्रसार; फळबागांवर आक्रमण होण्याची शेतकऱ्यांना भीती

वसई : गेले काही दिवस नायगाव खोचिवडे भागातील खाडीलगतच्या कांदळवनावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे तिवरांची झाडे वाळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कीड बागायती पट्टय़ातही शिरकाव करू  लागल्याने फळउत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

खाडीलगत तीन ते चार किलोमीटर अंतराच्या पट्टय़ात तिवरांच्या झाडांवर कीड पसरू लागली आहे. किडीमुळे झाडांची पाने करपून जात आहेत. ही कीड झाडांची पाने वेगाने फस्त करीत आहे. त्यामुळे खारफुटीची झाडे नष्ट होण्याची भीती पर्यावरण कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

किडीचा प्रसार वेगवान आहे. त्यामुळे काही दिवसांतच खोचिवडे येथील घरांवर ही कीड पसरली आहे. या भागातील इतर वनस्पती आणि फळफुलांची बागांवर या किडीने आक्रमण केल्यास उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या किडीचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी ‘जनसेवा फाऊंडेशन’चे अध्यक्ष विजय वैती यांनी केली आहे.

मागील वर्षी वसईतील काही भागांत पांढऱ्या माशीच्या झुंडीने हल्ला करून शेतीचे नुकसान केले होते.त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.

किडीला खाणारेही आहेतच..

* पाने खाणारी अळी (हायब्लेया प्यूअरा क्रामर) म्हणून या किडीला संबोधले जाते.

* कोरडय़ा वातावरणात या पानअळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होत असतो. तर याची उत्पत्तीही या काळात जास्त होत असते.

* या प्रजातींची पान खाणारी अळी विशेषत: सागवान आणि कांदळवन या झाडांवर आक्रमण करते. जेव्हा या किडींचे आक्रमण वाढते त्या वेळी त्याला खाणारे पशु-पक्ष्यांचे प्रमाणदेखील वाढते. त्यामुळे त्याचे प्रमाण नैसर्गिकरीत्या आटोक्यात येते.

आजवर या किडीने सागवन आणि कांदळवनाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही फळझाडांवर आक्रमण केल्याच्या घटनेची नोंद झालेली नाही.

– अंकुश धने, शास्त्रज्ञ, कीटकनाशक संशोधन विभाग