कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्य सरकारने कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यवतमाळमधील दोषी कंपन्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्याने १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक शेतकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर २५ शेतकऱ्यांना अंधत्व आले आहे. यवतमाळच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महत्त्वाची घोषणा केली. कीटकनाशक फवारणीत दोषी कंपन्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. याशिवाय १० हजार शेतकऱ्यांना प्रोटेक्शन मास्कचे वाटप केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सोमवारी कीटकनाशक फवारणी प्रकरणाची घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली होती. आयोगाने केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजावत चार आठवड्यात माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.