कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर बुधवारी यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न झाला. फवारणीचा प्रयत्न करणाऱ्या सिकंदर शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सिकंदर शहा हा शेतकरी वारकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष असल्याचे समजते.

यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीने १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून विषबाधेमुळे अनेकांना अंधत्व आले आहे. ७५० हून अधिक शेतकरी उपचार घेत आहेत. कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडीच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशक फवारणी केली जात होती. यवतमाळमधील या घटनेनंतर शेतकरी संघटनांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांवर टीका केली होती. शेतकऱ्यांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला होता.

कीटकनाशक फवारणीप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बुधवारी यवतमाळमध्ये आले होते. यादरम्यान त्यांच्यावर कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न झाला. पोलिसांनी फवारणीचा प्रयत्न करणाऱ्या सिकंदर शहाला ताब्यात घेतले आहे. कीटकनाशक फवारणीमुळे एवढ्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हा प्रयत्न केल्याचे सिकंदर शहाचे म्हणणे आहे.

प्रलोभनांनी शेतकऱ्यांचा घात
कीड नियंत्रणासाठी तातडीचा हमखास उपाय म्हणून अतिजहाल विषारी कीटकनाशके फवारली जातात. काही कीटकनाशक उत्पादक कंपन्या विक्रेत्यांना विक्रीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रलोभने देत असल्याचे समोर आले आहे. विशिष्ट ‘लक्ष्य’ पूर्ण केल्यास सुवर्ण, महागडय़ा गाडय़ा, विदेश दौरे, नगदी रक्कम अशी प्रलोभने दिली जात असल्याचे समजते. या सर्व प्रकाराची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतल्याचे वृत्त आहे.