विषबळीप्रकरणी राज्य सरकारचा शेतकरी व शेतमजुरांवर खापर फोडण्याचा प्रयत्न?

सोयाबीन व कपाशी पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना १८ जणांचा बळी तर  ५०० जणांना विषबाधा झाल्याच्या घटनेने राज्यातील कृषीक्षेत्रातील संशोधक व तज्ज्ञ हादरून गेले आहे. शेतमालामध्ये विषअंश राहणार नाही याची दक्षता घेणाऱ्या यंत्रणा व संस्था यांच्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य सरकारने विषबळीचे हे प्रकरण गांभिर्याने घेतले नसून त्यामुळे वस्तुस्थिती पुढे येण्याची शक्यता दुरावली असून नेहमीप्रमाणे शेतकरी व शेतमजुरावर खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हरितक्रांतीनंतर १९६५ नंतर पिकांवरती कीड व रोग निवारणासाठी विषाचा वापर सुरू झाला. फरीदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक नियंत्रण मंडळ पिकांवरील विषवापराला परवाणगी देते. कोणत्या पिकांवर कोणते विष फवारायचे याच्या शिफारशी केल्या जातात. देशात बहुतेक विष परदेशातून विशेषत जर्मनीतून आयात केले जाते. या विषाच्या चाचण्या प्रथम उंदीर, ससे आदी प्राण्यांवर व नंतर पिकांवर घेतल्या जातात. देशातील ७५ हून अधिक कृषी विद्यापीठे, कृषी अनुसंधान परिषदेचे शेकडो संशोधन केंद्रांमधून चाचण्या घेवून कोणत्या पिकांवर कोणती विषे मारायची याच्या शिफारशी करतात. हजारो शास्त्रज्ञ या कामात योगदान देत असतात. त्याखेरीज शेतमालामध्ये विषाचा अंश शिल्लक राहिला का, याची तपासणी करणार्या सुमारे २८ प्रयोगशाळा देशात असून राज्यात ४ प्रयोगशाळा आहेत. बाजारातून भाजीपाला घेवून त्याची तपासणी करुन अहवाल थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पाठविले जातात. देशात विषाच्या वापराचा कायदा असून त्यात वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहे. संशोधन संस्थेच्या शिफारशीनुसार विषाचा अंश किती आहे, त्याचा दर्जा याची तपासणी कृषी विभाग करतो. विविध प्रयोगशाळांमध्ये ते तपासणीसाठी वारंवार पाठविले जातात. विशेष दक्षता घेतली जात असूनही विषबाधेची घटना घडली. आता यवतमाळच्या घटनेनंतर मात्र माणसाच्या शरिरात विषाचे अंश असल्याचे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत सांगितल्याने तज्ज्ञ हादरून गेले आहे.

कीटकनाशकावर विष हे किती विषारी आहे हे त्रिकोणाच्या खुणेद्वारे स्पष्ट केलेले असते. अतिविषारी असेल तर लाल त्रिकोण, विषारी पिवळा, सावधगिरी बाळगण्याचे निळा व सुरक्षित विष असल्याचा हिरव्या त्रिकोणाची खूण असते. अतिविषारी विष शेतात वापरले जात नाही. त्याच्या वापराला बंधने आहेत. सध्या बाजारात ५००हून अधिक प्रकारचे विष उपलब्ध आहेत. केंद्रीय विष नियंत्रण मंडळ हे वारंवार तपासण्या करीत असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार काही विषांवर बंदी घातली जाते. आता मंडळाने ६२ विषांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. तज्ज्ञांच्या तपासणीनुसार त्यावर बंदीचा लवकरच निर्णय अपेक्षित आहे. यवतमाळच्या घटनेत मोनोक्रोटोफॉस हे विष वापरण्यात आले होते. त्याला भाजीपाला पिकांवर वापरण्यास बंदी आहे. २०२० साली त्याच्यावर बंदी येणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. नागपूरच्या राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्राने या विषाची शिफारस केलेली नाही. पण तरीदेखील त्याचा वापर करण्यात आला. तसेच मराठवाडय़ात कृषीसेवा केंद्राचे चालक हे अनेक प्रकारची विष एकत्र करुन वापरतात. त्यामुळे नवीनच रसायण तयार होते. कोणते रसायन तयार झाले हे समजू शकत नाही असे तज्ञांचे म्हणने आहे.

यवतमाळच्या घटनेनंतर नागपूरच्या राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्रातील संशोधक व्हि. एस. नगरावे, अकोले येथील पंजाबराव कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.डी. बी. उंदीरवाड, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी सहसंचालक लोखंडे यांनी पाहणी केली. त्यांनी कीटकनाशकाच्या वापर चुकीच्या पद्धतीने झाला. फवारणी योग्य पद्धतीने केली नाही असा निष्कर्ष काढला. असे असले तरी अद्याप या प्रकरणी राज्यसरकारने विशेष चौकशी पथक नियुक्त केलेले नाही. मुळात शेतकऱ्यांनी मोनोक्रोटोफॉस, सायपरमेथ्रीन, प्रोफेक्ससुपर, पोलो आदी औषधे मारली होती. ही औषधे राज्याच्या अन्य भागात कपाशीसह अन्य पिकांवर मारली जातात. नगर, औरंगाबाद, पुणे, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ात कपाशीचे पीक सहा फुटांपेक्षा अधिक वाढते. राज्यभर कपाशीचे पीक घेतले जात असून त्यावर औषधे मारली जातात. पण अशा घटना तेथे घडलेल्या नाही. यवतमाळ जिल्’ाातच ही घटना घडल्याने संशोधक गोंधळले आहेत. मात्र विषाची तपासणी तसेच कपाशीची तपासणी, वैद्यकीय अहवाल आदींची माहिती तज्ञांना उपलब्ध नसल्याने त्यांना नेमके कारण स्पष्ट करता आलेले नाही. पश्चिम महाराष्ट्र, खांदेश, मराठवाडय़ात आता डाळिंब, द्राक्ष व कपाशीसह भाजीपाल्यावर विष वापरले जाते. पण तेथे अपवादानेच अशा घटना घडल्या आहेत. पूर्वी उस्मानाबाद जिल्ह्य़ात सोयाबीनवर लॅनेट हे औषध वापरल्याने विषबाधा झाल्या होत्या. त्यावेळी कंपन्यांनी या औषधाची शिफारस आम्ही तुरीवर केली असून सोयाबीनवर केलेली नाही असा खुलासा केला होता. त्यातून विषनिर्मिती करणाऱ्या कंपन्या बिनबोभाट बाहेर पडल्या होत्या. तेव्हाही शेतकऱ्यांवरच खापर फोडण्यात आले होते.

सध्या बाजारात बनावट विषाची विक्री करणाऱ्या शेकडो कंपन्या आहेत. त्यापकी काही कंपन्या या विविध नामांकित कंपन्यांच्या ब्रँडच्या नावाने विषे विकतात. हुबेहूब पॅकिंग करतात. काही दुकानदारांना जास्त कमिशनचे आमिष दाखवून विक्री करतात. बनावट विषाला आळा घालण्यात अद्याप सरकारला यश आलेले नाही. चिनमधून बनावट विषाची मोठय़ा प्रमाणात देशात तस्करी होते. ही बाजारपेठ विकसित झाली आहे. दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील निवृत्त कीटकशास्त्रज्ञ सुभेदार जाधव यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी नेमक्या कारणाचा शोध घ्यावा असे मत व्यक्त केले आहे. तसेच बनावट विषामुळे असे घडू शकते अशी शंकाही घेतली आहे. तसेच सर्वागीण अभ्यास झाला पाहिजे असे मत नोंदविले आहे.

विषामुळे झालेल्या मृत्यूच्या घटना या दुखद आहेत. त्याने संशोधकांनाच नाही तर कृषी क्षेत्राला धक्का बसला आहे. चिंता वाढविणारी ही घटना आहे. विविध विष एकत्र करून मारण्याची टक्कर पद्धत बंद झाली पाहिजे. संशोधन संस्थांच्या शिफारशी शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचून त्याची अंमलबजावणी झाली पहिजे. फवारणी करताना दक्षता घेण्याची गरज आहे. चौकशी अहवालानंतरच मत व्यक्त करता येईल. बनावट विषालाही आळा घालण्याची गरज आहे.

डॉ.सी.एस.पाटील, प्रमुख शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी