शहरातील स्टेशन रस्त्यावरील प्रलंबित उड्डाणपुलाच्या वादात नेमण्यात आलेल्या लवादाची बैठक उद्या (रविवार) पुण्यात होणार आहे. दरम्यान तत्पूर्वी शनिवारी ए. व्ही. देशिंगकर यांच्या अध्यक्षतेखालील या लवादाच्या तिन्ही सदस्यांनी उड्डाणपुलाच्या जागेची म्हणजेच स्टेशन रस्त्याची पाहणी केली.
गेली तब्बल सात वर्षे हा उड्डाणपूल रेंगाळला आहे. त्यामुळेच या पुलाचा उभारणीखर्चही वाढला असून, जुन्या अंदाजपत्रकानुसार शहरात उड्डाणपूल बांधण्यास विकसकाने नकार दिला आहे. या वादावर देशिंगकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय लवाद नेमण्यात आला आहे. लवादाच्या अन्य सदस्यांमध्ये जी. के. देशपांडे व पी. जी. गोडबोले यांचा समावेश आहे. या तिघांनी शनिवारी नगरला भेट देऊन प्रस्तावित उड्डाणपुलाच्या जागेची म्हणजेच स्टेशन रस्त्याची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. खैरे व नगर उपविभागाचे उपअभियंता ए. एस. पवार तसेच या रस्त्याची विकसक कंपनी चेतक एन्टरप्राईजेसचे सुनील भोसले त्यांच्या समवेत होते.
अध्यक्षांसह लवादाच्या सदस्यांनी बिस्कीट कारखाना चौक ते नेवासकर पेट्रोल पंप या टप्प्याची प्रस्तावित उड्डाणपुलाच्या दृष्टीने पाहणी केली. खैरे व पवार यांनी त्यांना माहिती दिली. तत्पूर्वी शुक्रवारीच लवादाच्या भेटीसाठी या रस्त्यावर दोन्ही बाजूने खुणा करण्यात आल्या होत्या. भुयारी जलवाहिन्या, वीज, फोनच्या तारा अशा गोष्टी त्यात स्पष्ट करण्यात आल्या होत्या. ही पाहणी केल्यानंतर आता उद्या पुणे येथे लवादाची बैठक होणार आहे.
राज्य सरकारने खासगीकरणातून नगर-पुणे राज्यमार्गाचे चौपदरीकरण केले आहे. यातील शिरूर ते नगर या दुस-या टप्प्यातील कामात नगर शहरातील अत्यंत रहदारीच्या स्टेशन रस्त्यावर उड्डाणपूल प्रस्तावित आहे. विकसकाने राज्यमार्गाचे काम पूर्ण केले, मात्र नगर शहरातील उड्डाणपुलाची जागा वेळेवर ताब्यात न मिळाल्याने मुळातच या कामाला विलंब झाला. निर्धारित मुदतीत विकसकाला स्टेशन रस्त्याची जागा ताब्यात मिळाली नाही. भूसंपादन खात्याकडून त्यात मोठाच विलंब झाला. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाचा खर्च काही पटीने वाढला आहे. मूळ अंदाजपत्रकात त्याची किंमत १५ कोटी रुपये होती, ती आता तब्बल ८५ कोटींवर गेली असून या दराने उड्डाणपूल बांधण्यास विकसक तयार नाही. याच वादावर लवाद नेमण्यात आला आहे.