येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी वास्तुविशारद आणि त्यांचे १३ जणांचे एक पथक दाखल झाले आहे. मंदिरातील दगडांमधील भेगा, पडझड, तसेच इतर गोष्टींची पाहणी अत्याधुनिक तंत्रज्ञांनाच्या साहाय्याने तपासली जात आहे. यामध्ये ‘बायोस्कोप कॅमेऱ्या’द्वारे मंदिराची पाहणी केली जात असून या तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदाच केला जात असल्याचे पुरातत्त्व विभागातील वास्तुविशारद प्रदीप देशपांडे यांनी सांगितले.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे बांधकाम पुरातन काळातील आहे. मात्र मंदिराच्या सुधारणा आणि इतर कारणांमुळे बांधकाम आणि इतर बदल करण्यात आला. याबाबत गेल्या वर्षी पुरातत्त्व विभागाला मंदिर समितीने मंदिराचे मजबुतीकरण, मंदिरातील बदल आदीं बाबत तज्ञ मंडळीकडून एक आराखडा तयार करण्याबाबत पत्रव्यवहार केला. त्यानुसार औरंगाबाद येथील प्रदीप देशपांडे या वास्तुविशारद यांना हा आराखडा तयार करण्याचे काम दिले. यामध्ये वास्तुविशारद, तंत्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे. यंदा प्रथमच इन्फ्रारेड, बायोस्क ोपी कॅमेऱ्याचाही वापर केला जाणार आहे.

दरम्यान, मंदिराच्या जतन संवर्धनाबाबतचा हा अहवाल पुरातत्त्व विभाग मंदिर समितीला देणार असून तो शासनाकडे पाठवणार असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. मंदिराच्या जतन संवर्धनाबाबत पुरातत्त्व विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यावर त्याला समिती आणि  शासनाची मंजुरी घेतली जाईल. याचे कामही पुढे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर

यापूर्वी मंदिराचे मोजमाप झाले नाही की मंदिराचा नकाशा समितीकडे नव्हता. त्यामुळे या पथकाच्या माध्यमातून मंदिराचे मोजमाप,नकाशा, कुठे मोडतोड झाली, कुठे झीज झाली, बांधकामाला भेगा किती पडल्या आहेत, आदी बाबींची माहिती आणि रेखाचित्र तयार केली जात आहेत. यासाठी ‘इन्फ्रारेड कॅमेऱ्याची मदत घेतली जात आहे. तसेच ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत त्या ठिकाणी ‘बायोस्कॉप कॅमेऱ्या’च्या माध्यमातून त्याची खोली, रुंदी मोजून फोटो घेता येणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे अचूक माहिती मिळू शकेल आणि ‘बायोस्कोपी’ तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदाच करीत असल्याची माहिती प्रदीप देशपांडे यांनी दिली आहे.