स्वप्ननगरी मुंबईमध्ये प्रत्येक जण काही ना काही स्वप्न घेऊन येतो. मग ते क्षेत्र कोणतेही असो, मुंबापुरीचा प्रतिसाद मिळणारच! सिनेमा पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील खानापूर या गावच्या अजित साबळे याची चहावाला ते दिग्दर्शक ही कहाणी प्रेरणादायी अशीच आहे. नावाजलेल्या १६ नाटकांत, ६ मालिकांमध्ये, ५ चित्रपटांत काम तसेच ४ शॉर्ट फिल्म केल्यानंतर अजित लेखक-दिग्दर्शक म्हणून ‘पटरी बॉईज’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित करत आहे.
इंडस्ट्रीबद्दलची कुठलीही पाश्र्वभूमी नसणाऱ्या तसेच विरोध असणाऱ्या कुटुंबात अजित लहानाचा मोठा झाला. गावात यात्रेनिमित्त होणाऱ्या सोंगी भजनामध्ये (हौशी नाटक) सोंगाडय़ा तो फार आवडीने काम करायचा. यातच करीअर करायचे म्हणून आजरा हायस्कूलमध्ये सहावीमध्ये शिकत असतानाच कुणाचेही न ऐकता मुंबईत पोहोचला. घरची परिस्थिती व शिक्षणात न रमणारे मन दोन्ही गोष्टी बाजूला सारत ‘लोअर परेल’ येथे चहाच्या टपरीवर दिवसा काम करून रात्री सहकार नाईट या शाळेत शिकत अभिनय कार्यशाळेत जाऊ लागला.
नाटकाच्या वेडाने झपाटल्याने अल्पावधीतच कलासक्त लालबाग परेल विभागात तो प्रसिद्ध झाला. नाटक आणि चित्रपटात कामे मिळत होती. मात्र घरच्यांचा विरोध होता. अशा वेळी श्याम राणे, नामदेव जाधव, विठोबा तेजम, विलास जाधव या जिवाभावाच्या मित्रांच्या सहकार्याने आणि आधाराने पथनाटय़, एकांकिका, लोकनाटय़ असा प्रवास करत संघर्ष चालूच ठेवला. सायन धारावी येथील विनीत िशगारे, चतन्य पिसाळे आणि आकाश वैद्य यांच्यासोबत शॉर्ट फिल्म बनवल्या. त्या यशानंतर ‘चौकट राजा’ हा नवोदित कलाकारांचा संघ तयार करून नाटक आणि चित्रपट व्यवसायात पाऊल मजबूत केले.
विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी अजितने अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनाच्या कामाचा धडाका लावला. आता ‘वार’ फिल्म्स व एव्ही एन्टरटेन्मेंट तर्फे व्यंकटवर्धन नरसिंहन अय्यंगार यांच्या आगामी ‘पटरी बॉईज’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक म्हणून तो काम पाहात आहे. या चित्रपटासाठी मनोज पेरूनकर यांच्यासोबत तो पटकथा, संवाद व दिग्दर्शन करत आहे.
हा सिनेमा हार्बर लाईनच्या बाजूने असणाऱ्या झोपडपट्टीतील सहा मित्रांची कथा आहे. यात नव्या चेहऱ्यांसोबत काही नावाजलेले जुने चेहरेही आहेत. त्याच्या या ‘पटरी बॉईज’च्या सेटवर तो सदैव कुठल्या ना कुठल्या व्यक्तिरेखेच्या आविर्भावातच
वावरत असतो. अनेक सामाजिक विषय चित्रपट या प्रभावी माध्यमातून हाताळायचे असून स्वतची वेगळी छाप निर्माण करण्यावर भर असल्याचे अजित सांगतो. तीव्र इच्छाशक्तीने आणि अथक परिश्रमाने आपले ध्येय लवकरात लवकर गाठता येते याचे उदाहरण अजित साबळेने घालून दिले आहे.