साक्रीतील करोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील एकूण ४६ लोकांना आता साक्री येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सर्वाना किमान १४ दिवसांसाठी आरोग्य यंत्रणांच्या देखरेखीत रहावे लागणार आहे. यामुळे करोनाची साखळी खंडित होण्यास मदत होईल आणि संभाव्य धोका टळेल, असा दावा हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी केला आहे.

साक्रीतील करोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. मृत रुग्णाचे १४ नातेवाईक आणि अन्य ३२ लोकांचा मृत रुग्णाशी संपर्क झाला होता. यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी त्यांचा शोध घेवून त्या सर्वांची तपासणी केली. या सर्वांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत. परंतु, हे सर्वच मृत करोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आले असल्याने यंत्रणांनी खबरदारी घेतली. कोणताही धोका न पत्करताा या सर्वच ४६ लोकांना अन्य लोकांच्या संपर्कात न येवू देण्याचा निर्णय झाला. परिणामी, त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. सर्व ४६ संशयितांना डॉ. मनीष पाटील यांच्याकडे सुपूर्द केले आहे. डॉ.पाटील यांनी तातडीने संशयितांना साक्री येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. आता हे ४६ संशयित पूर्णपणे देखरेखीखाली असल्याची माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली आहे.

दरम्यान, जुने धुळे आणि मच्छीबाजार, मौलवीगंज परिसरा बुधवारपासून दोन दिवस प्रतिबंधित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भविष्यात जर शहरात करोनाची साथ पसरली आणि एखादा भाग संपूर्णपणे प्रतिबंधित करावा लागल्यास काय करावे, याची रंगीत तालीम यानिमित्ताने होणार आहे. यासाठी मनपातर्फे पूर्वतयारी आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील विशिष्ट भागात रुग्ण आढळल्यास तो भाग संपूर्णत: विशिष्ट कालावधीसाठी प्रतिबंधित करावा लागेल. याकाळात नागरिकांना आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू घरपोच कशा प्रकारे पोहोचवता याव्यात आणि त्यासाठी कशी कार्यपद्धती अवलंबावी तसेच जीवनावश्यक वस्तूंचे पुरवठादार, महापालिका आणि नागरिक यांच्यामध्ये साखळी पद्धत निर्माण करून नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संबंधित व्यापारी संघटना प्रतिनिधीेंसोबत आयुक्त अजिज शेख यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे उपस्थित होते.

शहरात प्रायोगिक तत्त्वावर रंगीत तालीम म्हणून जुने धुळे परिसर, मच्छीबाजार, मौलवीगंज परिसर बुधवार आणि गुरूवार दोन दिवसांसाठी पूर्णपणे प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांत त्या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अन्नधान्य, भाजीपाला आणि दूध घरपोच होण्यासाठी त्या भागातील वस्तू पुरवठादारांचे दूरध्वनी क्रमांक तसेच वस्तू वाटप करणाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक घेण्यात येऊन नागरिकांना कळविण्यात येतील. तसेच संबंधित भागातील नगरसेवकांशी संपर्क करून त्यांना याबाबत माहिती देण्यात येईल. याप्रकारे टप्प्याटप्प्याने शहरातील विविध भागात विशिष्ट कालावधीसाठी प्रतिबंधाची कार्यवाही होणार आहे.