प्रचारात झटून काम करा आणि मतदारांशी संपर्क वाढवा, असा मंत्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे अल्प भेटीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. चिकलठाणा विमानतळावर कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारल्यावर १५ मिनिटे थांबून मोदींनी छोटेखानी मार्गदर्शन केले.
राजस्थानातून विमानाने आगमन झाल्यावर थोडा वेळ थांबून मोदी नगरच्या सभेसाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. जालन्याचे भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा घेण्यात येणार आहे. सभेची तारीख निश्चित झाली नसली, तरी सभा घेण्याचे मात्र ठरले आहे, असे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात आले. जालना मतदारसंघाचे मतदान २४ एप्रिलला आहे. त्यापूर्वी सभा घेण्यास पुरेसा अवधी आहे. त्यामुळे लवकरच सभेची निश्चिती होईल, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, प्रदेश चिटणीस अतुल सावे, शिरीष बोराळकर, बापू घडामोडे, नारायण कुचे आदींची उपस्थिती होती.