News Flash

वर्धा : करोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना सूचना

देवीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणुका काढता येणार नाहीत

जिल्हाधिकार विवेक भीमनवार

करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित आहे. यासाठी वर्धा जिल्ह्यात नवरात्रोत्सवा दरम्यान होणारी गर्दी कमी करुन, कोविड आजाराचा प्रसार टाळण्यासाठी या वर्षीचा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नवरात्रोत्सवा दरम्यान मिरवणुका, शोभायात्रा काढता येणार नसून गर्दी होणार नाही, याची जाणीव ठेऊन उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.

नवरात्रोत्सवाचे आयोजन करणाऱ्या मंडळांना सबंधित नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीची पूर्व परवाणगी घेणे आवश्यक राहील. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावे. देवीची सजावट साध्या पध्दतीने करावी, देवीची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरीस ऐवजी प्राधान्याने पर्यावरण पुरक मातीच्या मूर्तीची स्थापना करावी. मंडळासाठी ४ फुट उंच व घरगुती २ फुट उंची पर्यंतच मूर्तीची स्थापना करता येईल. मूर्ती ऑनलाईन पध्दतीने विकत घेण्यास प्राधान्य द्यावे. देवीच्या मूर्ती विक्री करीता स्थानिक प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शक सुचना लक्षात घेऊन जागा निश्चित करुन ईश्वर चिठ्ठीने जागा वाटप करावी. मूर्ती विक्रीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावावा.

देवीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणुका काढता येणार नाहीत. तसेच, विक्री ठिकाणाहून मूर्ती आणण्यासाठी सार्वजनिक मंडळांतर्फे जास्तीत जास्त चार व्यक्ती व घरगुती देवीसाठी जास्तीत जास्त दोन व्यक्तींना जाण्याची परवानगी असेल. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने कमीत कमी व साधी सजावट करावी. दरवर्षी प्रमाणे मोठा मंडप न टाकता केवळ मूर्ती व सजावट यांचे पावसापासून संरक्षण होईल, इतपत आकाराचे मंडप उभारावेत. मंडळांना वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची काळजी घ्यावी. कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करु नये. त्याऐवजी बॅनरद्वारे करोना विषयक जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच आरोग्य शिबीर, आरोग्य विषयक कार्यक्रम करावे.

आरती, भजन किर्तन किंवा अन्य कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी माध्यमाद्वारे उपलब्ध करुन दयावी. दररोज देवीच्या मंडपाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. भाविकांसाठी शारिरीक अंतराचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे. विर्सजनाच्या दिवशी घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा प्रतिबंधीत क्षेत्रात असेल, तर मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी विसर्जित करण्यास सक्त मनाई असणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले करोना सबंधी आदेश व विहित केलेल्या नियमांचे पालन करणे नवरात्रोत्सव मंडळांना बंधनकारक असेल. असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 3:15 pm

Web Title: instructions to the citizens from wardha district collector on the background of navratri festival msr 87
Next Stories
1 महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे ‘मराठी भय्ये’ माफी मागणार का?-जितेंद्र आव्हाड
2 …त्यांनी मानसिकदृष्ट्या चांगलं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे; शिवसेनेचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
3 राज्यातील शाळा दिवाळीपर्यंत राहणार बंद; बच्चू कडू यांची माहिती
Just Now!
X