संरक्षक भिंती अनेक ठिकाणी कमकुवत; घुसखोरीच्या घटनेने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

हेमेंद्र पाटील, बोईसर

देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेव्यवस्थेत त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. गेल्याच आठवडय़ात संरक्षक भिंतीला भगदाड पाडून प्रकल्पाच्या आवारात घुसखोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली होती. अणुऊर्जा प्रकल्पाच्या संरक्षक भिंतींमध्ये अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे आणि अनेक ठिकाणी भिंत कमकुवत झाल्याचे उघडकीस आले.

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या आवारात कडेकोट बंदोबस्त असतो, त्याशिवाय चारस्तरीय सुरक्षा व्यवस्था असते. मात्र गेल्या आठवडय़ात अणुऊर्जा प्रकल्पाच्या सर्वात बाहेर असलेल्या दगड भिंतीला भगदाड पाडून एक तरुण प्रकल्पाच्या आवारात फिरत असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी (सीआयएसएफ) त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात तारापूर पोलीस ठाण्यात बेकायदा प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधीही घुसखोरीचे प्रकार घडले असल्याने सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत.

अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाहेर दगडी बांधकामाची भिंत, त्यापलीकडे जाळीने वेढलेले कुंपण असून दोन सुरक्षास्तराच्या दरम्यान गस्तीचा मार्ग आहे. या मार्गावरून सीआयएसएफमार्फत गस्ती घातली जाते. प्रकल्पाच्या भोवती असलेल्या दगडी सुरक्षा भिंतीवर तारेचे कुंपण असून भिंत चढून ती ओलांडणे अशक्य बाब आहे. जाळीच्या कुंपणानंतर मुख्य प्रकल्पाच्या गार्डहाऊस गेटजवळ पुन्हा दगडी संरक्षण भिंतीचे आवरण प्रकल्पाच्या भोवती अस्तित्वात आहे. त्याबरोबरीने प्रकल्प इमारतीला दोन उंच जाळीचे कुंपण बसवण्यात आले असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची निरंतर पाहणी केली जाते. इतक्या प्रकारे सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली असली तरी प्रकल्पाच्या बाहेरच्या भागात सहजपणे घुसखोरी होत असल्याचे दिसून आले आहे. बाहेरची संरक्षक भिंत अनेक ठिकाणी कमकुवत झाली असून काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. पावसाचे पाणी बाहेर निघण्यासाठी असलेल्या मार्गावरील लोखंडी जाळय़ांना गंज पकडला असून त्यामधून शिरकाव करणे सहज शक्य आहे.

संरक्षक भिंतीला भगदाड पाडून किंवा लोखंडी जाळय़ा काढून काही जण आतील बाजूस असलेल्या झाडांवरील नारळ किंवा अन्य वस्तूंची चोरी करण्यासाठी शिरकाव करतात. संरक्षण भिंतीला भगदाड पाडून चोरीच्या उद्देशाने अनेकांनी घुसखोरी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

घुसखोरीच्या घटना

’ बीएआरसी प्रकल्पात सुरू असलेल्या प्रकल्प उभारणीच्या कामात कामगार त्याच भागात वास्तव्य करून राहत होते, त्यांच्याकडे स्मार्टफोन असल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती.

’ बीएआरसी प्रकल्पाच्या कामगारांचे गेटपास बनवण्यासाठी ठेकेदारांने सुरक्षा अधिकारी यांची खोटी स्वाक्षरी वापरून बनावट पास बनवण्याचा प्रकार घडला होता.

’ प्रकल्पातून पावसाचे सांडपाणी निघण्यासाठी ठेवण्यात आलेल्या जाळीला तोडून प्रकल्पात प्रवेश करण्यात आला होता आणि केबल चोरी झाल्याचे पुढे आले होते.