कातडे, इतर अवयव व शस्त्रे जप्त

चंद्रपूर : राजुरा येथील वनविभागाच्या भरारी पथकाला गृप्त माहितीच्या आधारे वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात यश आले आहे. भरारी पथकाने आरोपींकडून बिबटय़ाचे कातडे, इतर अवयव आणि शिकारीसाठी वापरण्यात आलेली साधने जप्त केली असून  एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून राजुरा येथील वनविभागाच्या भरारी पथकाने अखेर वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. गुप्तता पाळून सतत या गुन्हेगारांचा पाठपुरावा केल्यानंतर बिबटचे कातडे आणि शिकारीच्या साधनासंह सर्व नऊ आरोंपीना महाराष्ट्र व तेलंगणातून, वन कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. राजुरा येथील वन विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीवरू न त्यांनी कोरपना तालुक्यातील कुसळ येथील जगदीश लिंगु जुमनाके यांच्या घरी छापा मारला असता बिबट या प्राण्याचे कातडे आढळून आले. या प्रकरणाची माहिती घेताना हा बिबट तेलंगणातील आसिफाबाद जिल्हय़ातील वाकडी तालुक्यातील जंगलात मारून त्याचे कातडे येथे विक्रीसाठी आणण्यात आले होते. परंतु विक्री होण्यापूवीच वन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा छडा लावला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तेलंगणातील वाकडी तालुक्यातील पेवटा व चिचपल्ली गावातून प्रत्येकी तीन आरोपी, बंबारा गावातून एक आणि कोरपना तालुक्यातील कुसळ व चिंचोली येथून प्रत्येकी एक आरोपी अशा एकूण नऊ आरोपींना शिताफीने अटक केली आहे.

यात बिबटला मारणारा मुख्य आरोपी बारीकराव यशवंत आत्राम याला पेवटा येथून ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून बिबटय़ा व वाघ मारण्यासाठी वापरलेला लोखंडी साफळा, त्याचे दात, नख, मिशा व इतर अवयव हस्तगत करण्यात आले. हा लोखंडी साफळा बनवून देणाऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. या सर्व नऊ आरोपींकडून वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चंद्रपूर न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे. ऑक्टोबर महिन्यात तब्बल २५ दिवस चाललेल्या या मोहिमेत तेलंगाणातील वनअधिकारी व पोलीस अधिकार यांनी चांगले सहाकार्य केले.