News Flash

शिक्षणमंत्र्यांची पक्षांतर्गत शाळा

कॉपीमुक्त रॅलीला हजेरी लावून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शहरातील ठराविक भाजप व विद्यार्थी परिषद नेत्यांच्या घरी भेटी देऊन पक्षांतर्गत आपल्या ‘वर्गा’साठी राजकीय विद्यार्थ्यांची

| January 3, 2015 01:10 am

 कॉपीमुक्त रॅलीला हजेरी लावून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शहरातील ठराविक भाजप व विद्यार्थी परिषद नेत्यांच्या घरी भेटी देऊन पक्षांतर्गत आपल्या ‘वर्गा’साठी राजकीय विद्यार्थ्यांची चाचपणी केली. तावडे गुरुजींच्या या राजकीय शाळेची उघडपणे चर्चा होत आहे. पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेल्या तावडेंच्या स्वागताकडे भाजप आमदारांसह एकही पदाधिकारी फिरकला नसल्याने प्रदेशस्तरावरील नेतृत्व स्पध्रेचे परिणाम मंत्र्यांच्या दौऱ्यातही दिसून आले.
 बीड हा ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा. राज्यस्तरावर नेतृत्वस्पर्धा असली तरी मुंडेंच्या जिल्ह्यात इतर नेत्यांनी लक्ष घातले नव्हते. मुंडे यांच्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा असून, पक्षाच्या खासदारांसह पाच आमदार आहेत. मुंडे यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत दुसऱ्या फळीतील नेत्यांमधील स्पर्धा लपून राहिली नाही. मुंडे असतानाही अंतर्गत स्पध्रेतून विनोद तावडे यांच्या पक्षांतर्गत वर्गासाठी शेजारच्या लातूर जिल्ह्यात काही राजकीय विद्यार्थी मिळाले होते. या पाश्र्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी बीड जिल्ह्यात हजेरी लावली. पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले असल्याने पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेल्या तावडेंच्या स्वागताकडे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे वगळता एकही पदाधिकारी व पक्षाचा आमदारही फिरकला नाही. संयोजक गौतम खटोड यांनी पुढच्या वर्षी कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेऊन येण्याची गळ तावडेंनाच घातली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा अपवाद वगळता तावडे यांच्यासह सर्वानी गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख करण्याचे टाळले. तर मुंडेंचा शब्द प्रमाण असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह प्रा. सतीश पत्की यांच्या घरी तावडेंनी नाश्ता घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे व विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या घरी भेट देऊन शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाशी व संस्थाचालकांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या माजी आमदार उषा दराडे आणि राहुल दुबाले या कार्यकर्त्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन तावडे रवाना झाले. भाजपअंतर्गत राज्यपातळीवरील गटबाजीच्या राजकारणात तावडेंची भूमिका सर्वश्रुत असल्यामुळे भाजपमधील मुंडे समर्थक कार्यकत्रे तावडेंकडे फिरकलेच नाहीत. तावडे गुरुजींनी ही संधी साधत पक्षांतर्गत आपल्या वर्गासाठी राजकीय विद्यार्थी जोडण्याचा खुबीने प्रयत्न केल्याने तावडेंच्या वर्गात कोणाचा प्रवेश होतो, याकडे आता पक्षांतर्गत कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2015 1:10 am

Web Title: internal class in party by education minister vinod tawde
Next Stories
1 भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रावसाहेब दानवेंची निवड निश्चित
2 रायगडात लाचखोरीच्या २८  प्रकरणात ४३  जणांना अटक
3 सोनहिरा, केन अ‍ॅग्रो साखर कारखान्यांविरुद्ध गुन्हा
Just Now!
X