स्वपक्षीय अध्यक्षाला भाजप खासदाराने फटकारले

नव्या वर्षांत लातूरहून बंगळुरूपर्यंत आठवडय़ातून तीन दिवस नवी रेल्वे सुरू होत असली तरी त्याचे नेमके श्रेय कोणाचे यावरून लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात मानापमान नाटय़ रंगले आहे.

गतवर्षी लातूर मुंबई एक्स्प्रेस ही गाडी बिदपर्यंत विस्तारित करण्यावरून लातुरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन झाले. विलासराव देशमुखांनी सुरू केलेली रेल्वे ही बिदरवाल्यांनी पळवली अशी टीका सुरू झाली. लातूरच्या प्रवाशांचे मुंबईपर्यंत जाताना हाल होऊ लागले. बिदरहूनच सर्वसाधारण डबे भरून येत असल्यामुळे सामान्य प्रवाशांची कोंडी होऊ लागली. यावर तोडगा म्हणून बिदरहून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू होईल. लातूरची रेल्वे बिदपर्यंत गेली तर बिदरला थांबणारी बंगळूरुची रेल्वे लातूरला मुक्कामी येईल, असे आश्वासन संभाजी पाटील निलंगेकर व  डॉ. सुनील गायकवाड यांनी दिले होते.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे यासंबंधी पाठपुरावा केला होता. मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन हवेत विरले. मात्र ४ फेब्रुवारीपासून आठवडय़ातून तीन दिवस बिदरहून बंगळूरुला जाणारी रेल्वे लातूरला मुक्कामी येणार असून ती आता लातूरहून बंगळूरुपर्यंत धावणार आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सतत पाठपुरावा केला त्यामुळे ही रेल्वेची सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल पालकमंत्र्यांचे अभिनंदन करणारे परिपत्रक भाजप शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहाटी यांनी प्रसिद्धीस दिले. यावर डॉ. सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत संपप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत ते आमच्या अध्यक्षांचे अज्ञान असल्याचे जाहीरपणे सांगितले.  बेंगलोपर्यंत धावणाऱ्या रेल्वेला लातूर जिल्हय़ातील उदगीर येथे थांबा देण्यात आलेला नव्हता. तो थांबा मिळावा यासाठी आपण प्रयत्न केला. रेल्वेचा विषय हा खासदार म्हणून आपल्या अंतर्गत येतो त्यामुळे रेल्वेच्या ज्या सुविधा झाल्या त्याचे श्रेय व ज्या अडचणी निर्माण झाल्या त्याचे अपयश या दोन्हीलाही आपणच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर-अजमेर ही नवी रेल्वे सुरू करू असे आश्वासन दिले होते. त्याचा उल्लेख करीत खासदारांनी गडकरी यांनी पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत अजमेरची रेल्वे दोन-तीन महिन्यांत सुरू करू, असा आपल्याला शब्द दिलेला आहे त्यामुळे नव्या वर्षांत ही भेट मिळेल असे सांगितले.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी चाकूर येथील एका कार्यक्रमात जिल्हय़ातील लातूर रोड रेल्वेस्थानक हे चाकूरच्या जवळ असल्यामुळे त्याचे नामांतर चाकूर रोड असे करण्यास आपली मान्यता आहे व त्याचा आपण पाठपुरावा करू, असे सांगितले होते. त्यावर खासदारांनी दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी जरी एखाद्या रेल्वेस्थानकाचे नामांतर करायचे ठरवले तर ते लवकर शक्य नाही, त्याची काही प्रक्रिया असते असे सांगत पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर नाव न घेता टीका केली. लातूर रोडचे नामांतर करण्यासंबंधी आपली काय भूमिका आहे, या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपण यासंबंधी अजून विचार केला नाही असे सांगितले. आपण केलेल्या कामाची जाहिरातबाजी करण्यात आपल्याला रस नाही. जरी आपण विपणन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असले तरी आपण ते करणार नाही कारण आपला तो स्वभाव नाही. आपण जनतेचा खासदार असल्यामुळे सर्वाच्या प्रश्नासंबंधी आपण जागरूक असतो. आगामी निवडणुकीत तिकीट मिळावे यासाठी आपण काम करीत नाही, असे सांगत उमेदवारी मिळण्याचे जे बारा निकष पक्षाने ठरवले आहेत. त्या सर्व निकषात पकीच्या पकी गुण आपल्याला मिळाले असल्याचे सांगत आपली उमेदवारी नक्की आहे. त्यामुळे त्याला कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा काही उपयोग नाही असे न बोलता त्यांनी सांगून टाकले. शहर जिल्हाध्यक्षांच्या एका पत्रकामुळे लातुरात पालकमंत्री विरुद्ध खासदार, असा वाद चव्हाटय़ावर आला आहे.